श्रीनगर : राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस (Rain) सुरू असून राजधानी दिल्लीतही वातावरण फिरलंय. कारण, मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीने हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. त्यातच, आज दिल्लीतून श्रीनगरला जाणारे विमान वादळी वाऱ्याच्या चपाट्यात आल्याने श्रीनगर विमानतळावर या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. त्यामुळे, या विमानातून (Airplane) प्रवास करणाऱ्या 227 प्रवाशांची जीव भांड्यात पडला. विमान प्रवासी वाहतुकीत विमान कंपन्या आणि शासनाच्या उड्डाण मंत्रालयाकडून विशेष काळजी घेतली जाते. त्यात, पावसाळ्याच्या दिवसांत विमान कंपन्यांना व विमानसेवेला महत्त्वाचे संदेशही सातत्याने दिले जातात. त्यामुळेच, दिल्ली-श्रीनगर विमान प्रवासात सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. इंडिगोच्या या विमानातील सर्वच 227 प्रवासी सुखरुप असल्याचे विमान कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 

Continues below advertisement


इंडिगो विमानच्या या उड्डाणाचे ट्रॅकिंग पाहिल्यास हे विमान वादळात सैरभैर झाल्याचं दिसून येत आहे. आकाशातील वादळात विमान गोल गोल फिरत असल्याचे लक्षात येताच विमानातील क्रु मेंबर आणि पायलटच्या प्रसंगावधानतेमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. एअरपोर्ट अधिकाऱ्यांच्या म्हणण्यांनुसार, विमानाचे इमर्जन्सी लँडिग करताना कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, तसेच सर्व सूचना व मानकांचे पालन करण्यात आले आहे. 


दिल्ली ते श्रीनगर हवाई मार्गावर विमानाचा प्रवास सुरू असताना, बर्फाचा पाऊस आणि गारा पडत होत्या. त्यामध्ये, विमानाच्या पुढील बाजुच्या काही भागाचे नुकसान झाले आहे. विमान आकाशात हेलकावे घेत असताना प्रवाशांची धाकधूक वाढली होती, तर काही प्रवाशांनी आरडाओरडही सुरू केली. मात्र, फ्लाईट पायलट आणि  केब्रिन क्रू मेंबर्सने सर्वच सूचना व नियमांचे पालन करत विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले. त्यामुळे, सर्व प्रवाशांसह विमानाचे सुखरुप लँडिंग झाले आहे.