बॉलिवूडचा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख (Ritesh deshmukh) याचा बहुचर्चित सिनेमा राजा शिवाजी (Raja shivaji) पुढील वर्षी प्रदर्शित होत असून आज स्वत: रितेश देशमुखने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. रितेशने या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून काही दिवसांपूर्वीच त्याचा शिवाजी महाराजांच्या (shivaji maharaj) वेशभूषेतील लूकही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यातच, काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवत रेकॉर्ड निर्माण केला आहे. त्यामुळे, आता रितेश देशमुखच्या राजा शिवाजी चित्रपटाची उत्सुकता सर्वांना लागली असून आता चित्रपटाची तारीख जाहीर केल्याने प्रतिक्षा संपली असून आता चित्रपटाची उत्कंठा चाहत्यांना लागून आहे. 

अभिनेता म्हणून रितेश देशमुखचा चाहता वर्ग मोठा आहे, तर महाराष्ट्रात मराठमोळा रितेशभाऊ, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा चिरंजीव म्हणून देखील रितेश देशमुखची वेगळी ओळख आहे. त्यामुळे, रितेश देशमुखच्या प्रत्येक चित्रपटावर मराठी प्रेक्षक सातत्याने प्रेम करतो. तुझे मेरी कसम चित्रपटातून रितेशने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच सिनेमातून रितेशची बॉलिवूडमध्ये हीट एंट्री झाली. त्यानंतर, अनेक चित्रपटातून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले असून लय भारी आणि वेड या मराठी चित्रपटातून पुन्हा एकदा त्याने सिनेरसिकांची मने जिंकली आहेत. आता, महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि हिंदुस्थानच महापराक्रमी राजे शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित 'राजा शिवाजी' हा चित्रपट घेऊन रितेश देशमुख चाहत्यांच्या भेटीला येत आहे. रितेशच्या या चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच लागून होती. आता, या चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र दिनी सिनेमा प्रदर्शित

1 मे  2026 रोजी म्हणजे महाराष्ट्र दिनीच 'राजा शिवाजी' हा चित्रपट प्रदर्शित होत असून 6 विविध भाषांमध्ये सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये राजा शिवाजी सिनेमा प्रदर्शित होणार असल्याने देशभरातील विविध राज्यातील चाहत्यांना त्यांच्या भाषेत सिनेमाची कथा आणि गौरवशाली इतिहास पाहण्याचा आनंद मिळणार आहे. 

छावा सिनेमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

अभिनेता विकी कौशलच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारीत छावा या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर रितेशच्या राजा शिवाजी या सिनेमाबाबत सर्वांना उत्सुकता आहे. आत्तापर्यंत रितेश देशमुखच्या लूकचे दोन फोटो समोर आले आहेत. त्यामुळे चाहत्यांची सिनेमाबाबतची उत्सुकता वाढली आहे.