मुंबई : जर तुम्ही ट्रेन, बस किंवा इतर सार्वजनिक वाहनातून प्रवास करत असला तर त्याचे दरवाजे उघडणे किंवा खिडक्या उघडणे अगदी सामान्य गोष्ट आहे. पण हीच चूक जर तुम्ही विमानात (Flight) केली तर मात्र तुम्ही अडचणीत येण्याची शक्यता असते. असाच एक प्रकार नुकताच समोर आलाय. नागपूरहून बंगळूरला जाणाऱ्या इंडिगोच्या (Indigo) विमानाचे एमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला. दरम्यान त्यामुळे या तरुणाला अटक करण्यात आली. सोमवार (2 ऑक्टोबर) रोजी पोलिसांकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. 


पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या तरुणाला अटक केल्यानंतर जामीनावर सोडण्यात आले आहे. स्वप्नील होले असं या आरोपीचं नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.  30 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास इंडिगोचे फ्लाइट क्रमांक 6E 6803 हे नागपूरहून बंगळूरच्या दिशेने उड्डाण करत होते. त्यावेळी या विमानात हा प्रकार घडला असल्याचं सागंण्यात येत आहे. 


क्रू मेंबर्सनी दरवाजा उघडण्यापासून थांबवले


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रवासी विमानाच्या एमर्जन्सी दरवाजाच्या जवळ बसला होता. विमान उड्डाण करण्यापूर्वी विमानाचे क्रू मेंबर्स प्रवाशांना फ्लाइट संबंधित माहिती देत ​​होते. त्यावेळीच या प्रवाश्याने आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. ही बाब विमान कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला तत्काळ असे करण्यापासून थांबवले. हा प्रकार पाहून विमानातील इतर प्रवासी देखील घाबरुन गेले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, हे विमान जेव्हा रात्री 11.55 बंगळूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले त्यावेळी या प्रवाश्याला अटक करण्यात आली. 


सुरक्षेचे नियम मोडल्यामुळे अटक


इंडिगो विमानाच्या एअरलाइन्सने याप्रकरणात सुरक्षेचे नियम मोडल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तर  भारतीय दंड संहितेच्या कलम 336 नुसार इतरांचे जीव किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्याअंतर्गत एफआयआर नोंदवून कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली. तर या प्रवाश्याचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. त्यानंतर आवश्यक की कायदेशीर प्रक्रिया पोलिसांकडून पूर्ण करण्यात आली असून त्याची जामीनावर सुटका देखील करण्यात आली आहे. 


या आधी देखील घडल्या होत्या अशा घटना 


तीन महिन्यांपूर्वी एका प्रवाश्याने चेन्नईवरुन तिरुचिरापल्लीला जाणाऱ्या विमानाचा इंडिगोच्या विमानाचा एमर्जन्सी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु असा प्रयत्न केल्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. यावेळी देखील विमानातील इतर प्रवासी घाबरुन गेले होते. तर अलीकडेच एका प्रवाशाने डेल्टा एअरलाइनच्या विमानाचे आपत्कालीन दार उघडले. पण ज्यावेळेस त्याने हे दार उघडले तेव्हा विमान हे लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर होते. 


हेही वाचा : 


Rolls Royce: गजब जुगाड! अवघ्या 45 हजार रुपयांमध्ये मारुती 800 बनली करोडोंची 'रोल्स रॉयस'; सारेच चकित