अमृतसर : पाकिस्तानपासून काहीच अंतरावर असलेल्या भारत-पाक सीमेवरील अटारीमध्ये 360 फूट उंच राष्ट्रध्वज उद्घाटन करण्यात आलं. देशातला हा सर्वात उंच राष्ट्रध्वज असल्याचं बोललं जातंय. पंजाबचे मंत्री अनिल जोशी यांनी या सर्वात उंच राष्ट्रध्वज देशातला सर्वात मोठा तिरंगा फडकवला. या राष्ट्रध्वजाच्या निर्मितीसाठी एकूण साडे तीन कोटी रुपये खर्च आला आहे. पंजाब सरकारच्या अमृतसर सुधार न्यास प्राधिकरणाच्या माध्यमातून याची निर्मिती करण्यात आली.

या तिरंग्याची उंची 360 फूट आहे, तर हा ध्वज 120 फूट लांब आणि 80 फूट उंच आहे. या तिरंग्याचं वजन तब्बल 100 किलो आहे. या तिरंग्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद करण्यात आली आहे. अटारीपासून लाहोर फक्त 20 किमी अंतरावर आहे. त्यामुळे अटारीत डौलाने फडकणारा तिरंगा लाहोरमधून सहज पाहता येतो.

या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला अनिल जोशी यांच्यासह बीएसएफचे महानिरिक्षक मुकुल गोयल, उपमहानिरीक्षक जे.एस. ओबराय, दिल्ली हेडक्वॉर्टरचे महानिरिक्षक सुमेर सिंह आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष कमल शर्मा उपस्थीत होते. दरम्यान, या ध्वज उभारणीस पाकिस्तानने सुरुवातीपासून आक्षेप घेतला आहे, या आक्षेपामुळे 2016 मधील पुर्ण होण्याची अपेक्षा असलेल्या या प्रकल्पाला वेळ लागला.

पहिला हा ध्वज सद्भावना द्वारपासून केवळ 30 फुट अंतरावर उभारण्यात येणार होता. मात्र, पाकिस्तानच्या सैन्य दलाने आक्षेप घेतल्यामुळे ध्वजाचं ठिकाण बदलून जॉईंट चेक पोस्ट अटारीच्या पंजाब सरकारच्या पर्यटन विभागाच्या जागेवर उभारण्याचं निश्चित करण्यात आलं. पण 1 मार्च 2017 रोजी याच्या ध्वज स्तंभात कॅमेरे असल्याचे कारण पुढं करत पुन्हा आक्षेप नोंदवला. मात्र बीएसएफने पाकचं हे कारणं धुडकावून लावत हा ध्वजस्तंभ उभारला.

यापूर्वी देशातील सर्वात मोठ्या तिरंग्यामध्ये रांचीच्या 293 फूट तिरंग्याची नोंद होती. मात्र त्यानंतर आता अटारीच्या 360 फूटाच्या ध्वजाची नोंद झाली आहे. रांची शिवाय, हैदराबाद (291 फूट), रायपूर (269 फूट), फरीदाबाद (250 फूट), पुणे (237 फूट), भोपाळ (235 फूट), दिल्ली (207 फूट), लखनऊ (207 फूट), अमृतसर (170 फूट) आकाराचे राष्ट्रध्वज डौलाने फडकत आहेत.