मुंबई: 30 वर्षे भारतीय नौदलाची शक्तीस्थळ म्हणून मिरवणारी आयएनएस विराट ही विमानवाहू युद्धनौका आज निवृत्त होत आहे. नौदलाच्या मुंबई गोदीत त्यासाठी एका विशेष समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. या अजस्त्र युद्धनौकेचं सारथ्य करणाऱ्या भारतीय आणि ब्रिटिश नौदलातील अधिकाऱ्यांना या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित करण्यात आलं आहे.


भारताच्या नाविक सामर्थ्याचे प्रतिक बनलेली आयएनएस विराट १९८७ साली भारतीय नौदलात दाखल झाली होती. तत्पूर्वी २७ वर्षे ती ‘एचएमएस हरमीस’ या नावाने ब्रिटिश नौदलाच्या ताफ्यात कार्यरत होती. भारतानं 1987 साली ब्रिटनकडून ही युद्धनौका खरेदी केली होती. निवृत्तीनंतर आयएनएस विराटचे रूपांतर संग्रहालयात करण्याची मागणी सध्या केंद्र सरकारच्या स्तरावर विचाराधीन आहे.

काय आहे विराटची ताकद:



जवळजवळ 24 हजार टन वजनाच्या 'विराट'ची लांबी 740 फूट आणि रुंदी 160 फूट एवढी आहे. यावर तब्बल 1500 नौसैनिक कायम तैनात असतात. विराटवर एकावेळी तीन महिने पुरेल एवढं खाद्या सामुग्री असते. कारण की, विराट एकदा समुद्रात गेल्यावर 90 दिवसांपर्यंत दुसऱ्या बंदरावर जात नाही. यावर तैनात असणारे सी-हॅरिअर लढाऊ विमान आणि सीकिंग हेलिकॉप्टर हे विराटची ताकद कैकपटीनं वाढवतात.

कोणत्याही देशाच्या नौदलाची ताकद असते ती तिची विमान वाहक युद्धनौका. ज्या देशांकडे अशाप्रकारच्या शक्तीशाली युद्धनौका असतात. त्यांची समुद्रातील ताकद हजारो पटीनं वाढते. या युद्धनौका म्हणजे चालते-फिरते किल्लेच असतात.

या युद्धनौकांवर मिग, सुखोई, मिराज इ. लढाऊ विमानं असतात. ज्या डोळ्याची पापणी लवते न लवते तोवर शत्रूला नेस्तनाबूत करु शकतात. ही युद्धनौकेवरील असणारा डेक या जवळजवळ दोन ते तीन फुटबॉल मैदानाइतका मोठा असतो. जिथून यावरील लढाऊ विमानं उड्डाण करतात. यावरुन तुम्ही अंदाज लावू शकता की, ही यौद्धनौका नेमकी किती मोठी असते.

किती महाग असतात युद्धनौका:



एक युद्धनौका प्रचंड महाग असते. (जवळजवळ 20 हजार कोटीपासून 50 ते 60 हजार कोटी एवढी त्याची किंमत असते) त्याची देखभाल करणं देखील तेवढचं महागडं असतं. यासाठी जवळजवळ वर्षाला 100 कोटी खर्च असतो. जोवर या युद्धनौका सक्षम असतात तोवर त्याचा खर्च उचलला जातो. पण जेव्हा या युद्धनौका निवृत्त होतात. त्यावेळी त्याची देखभाल करण्यासाठी बराच खर्च असतो.

त्यामुळेच मागील वर्षी संरक्षण मंत्रालयानं सर्व सागरी किनारपट्टी असलेल्या राज्यांना पत्र लिहून विराटचं म्युझियम व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. तर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी विराट खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणमध्ये पहिल्यापासूनच पाणबुडीचं म्युझियम आहे.

दरम्यान, याआधी 'आयएनएस विक्रांत' निवृत्त झाल्यानंतर तिला भंगारात विकण्यात आलं होतं. त्यानंतर देशभरातून याविषयी बरीच टीका करण्यात आली होती. विक्रांत ही 17 वर्षापूर्वी नौदलातून निवृत्त झाली होती.

भारतीय नौदलात 'विक्रांत' केव्हा आली?



भारतानं आयएनएस विक्रांत ब्रिटनकडून 60च्या दशकात खरेदी केली होती. त्यानंतर भारतीय नौदलात 30 ते 35 वर्ष काम केल्यानंतर विक्रांतला 1998 साली निवृत्त करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढील 17 वर्ष म्हणजेच 2015 सालापर्यंत ती मुंबई डॉकयार्डमध्ये उभी होती. त्यावेळी याच्या देखभालीसाठी जवळजवळ 100 कोटी खर्च होत होता. त्यामुळे विक्रांतला भंगारात विकण्यात आलं होतं.