नवी दिल्ली: देशाच्या जीडीपीमध्ये म्हणजे ढोबळ दरडोई उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. ही घट गेल्या सहा वर्षातील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचलीय. केंद्र सरकारच्या वतीने आज जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशाच्या जीडीपीचा विकास दर 2019-20 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत फक्त 5 टक्के आहे.
मागील आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीमध्ये जीडीपीचा वृद्धी दर 5.8 टक्के होता. तर 30 जून 2018 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाही अखेर हा दर 8 टक्के होता. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिस म्हणजे केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने आज जीडीपीबाबतची आकडेवारी जाहीर केली.
जीडीपीच्या वृद्धी दरात गेल्या सलग पाच तिमाहीमध्ये घसरण होत आहे. मार्च 2013 ला संपलेल्या तिमाहीत हा सर्वाधिक कमी म्हणजे 4.3 टक्के होता. त्यानंतर आताच एवढा कमी जीडीपी वृद्धी दर कमी झाला आहे. बाजार आणि अर्थक्षेत्रातील जाणकारांना यावेळी आर्थिक वृद्धी दरातील घसरण 5.7 टक्के राहील अशी अपेक्षा होती. मात्र हा दर त्यांच्याही अपेक्षित अनुमानापेक्षा कमी म्हणजे 5 टक्क्यांवर आला आहे.
मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणजे उत्पादन क्षेत्रातील घसरण गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत फक्त फक्त 0.6 टक्के आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत हा दर 12.1 टक्क्यांवर होता.
कृषि, जंगल संपत्ती आणि मत्स्य व्यवसाय यातील वृद्धीही दोन टक्क्यांपर्यंत घसरली आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत ही वृद्धी 5.1 टक्के होती. त्याशिवाय बांधकाम आणि गृहनिर्मिती क्षेत्र, व्यापार, हॉटेल, वाहतूक आणि दळणवळण या क्षेत्रातही घसरण आहे.
खणीकर्म - खाणव्यवसाय तसंच विद्युत, गॅस, पाणीपुरवठा यासारख्या लोकोपयोगी सेवा क्षेत्रात मात्र वाढ झाल्याचं आकडेवारीवरून पाहायला मिळतं. सर्वसामान्य ग्राहकांची क्रयशक्ती कमी झाल्याने ऑटोमोबाईल आणि अन्य क्षेत्रातली मागणी कमी झालीय. त्यामुळेच जीडीपीच्या वृद्धी दरात घसरण झालीय.