अहमदाबाद: जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचं भूमिपूजन केलं. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे भारताच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.


तर भारताच्या बुलेट ट्रेनच्या सुरक्षेची हमी आम्ही घेऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक किर्तीचे आणि दूरदृष्टी असलेले नेते आहेत. भारत आणि जपान सोबत आल्याने सर्व काही शक्य होईल, असा विश्वास जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी व्यक्त केला.

बुलेट ट्रेनच्या भूमिपूजनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पियुष गोयल, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह दिग्गज नेते हजर होते.

शिंजो आबे 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत, विशेषत: त्यांचा हा दौरा जरी भारताचा म्हटला तरी, दोन्ही दिवस आबे यांनी गुजरातमध्येच राहणं पसंत केलं आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी 1 लाख कोटी रुपये खर्च नियोजित असून, यासाठी जपाननं 88 हजार कोटीचं कर्ज दिलं आहे. हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे.  तर बुलेट ट्रेन हे पंतप्रधान मोदींचं स्वप्न आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या बीकेसीत बुलेट ट्रेनचं स्टेशन असेल. तिथून अवघ्या तासाभरात टेक्स्टाईल आणि डायमंड हब असलेल्या सूरतला पोहोचता येईल.

सध्या बुलेट ट्रेन कशी असेल?

सध्या बुलेट ट्रेनला 10 डब्बे असतील, ज्यामध्ये सुमारे साडेसातशे प्रवासी एकाचवेळी प्रवास करु शकतील. दररोज एका बाजूने 35 ट्रेन धावतील. दररोज जवळपास 36 हजार प्रवासी प्रवास करतील. सध्या बुलेट ट्रेनचं तिकीट 2700 ते 3000 रुपये असेल.

काय आहेत या प्रकल्पाची वैशिष्ट्ये-

  • मुंबई अहमदाबाद या 508 किमी अंतरावर ही बुलेट ट्रेन धावेल.

  • यातला 156 किमीचा मार्ग महाराष्ट्रातून, 351 किमी गुजरातमधून आहे

  • या बुलेट ट्रेन मार्गावर एकूण 12 स्टेशन्स असणार आहेत.

  • वांद्रे, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिल्लीमोरा, सुरत, भरुच, बडोदा, आनंद, अहमदाबाद, साबरमती ही ती 12 स्टेशन्स

  • ताशी 350 किमी धावण्याची क्षमता

  • अहमदाबाद-मुंबई अंतर रेल्वेनं पार करण्यासाठी सध्या 7 ते 8 तास लागतात

  • बुलेट ट्रेन हे अंतर तुरळक स्टॉपसह अवघ्या 2 तास 7 मिनिटांत पूर्ण करेल. सर्व स्टॉप घेतले तर हे अंतर 2 तास 58 मिनिटांत पार होणार आहे.

  • एकूण 1 लाख 8 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.

  • जपानकडून 0.01 टक्के व्याजदराने 50 वर्षांसाठी 88 हजार कोटीचं कर्ज

  • सुरक्षा आणि खर्चाच्या दृष्टीनं ही बुलेट ट्रेन एलिव्हेटेड म्हणजे उन्नत मार्गावर करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

  • फक्त मुंबईतले स्टेशन वगळले तर इतर सर्व ट्रॅक हा एलिव्हेटेड असणार आहे.


Mumbai Ahmedbad Bullet train

बुलटे ट्रेनचा मार्ग

  • एकूण प्रवास 508 किमी

  • 468 किमी प्रवास पुलावरुन

  • 27 किमी प्रवास जमीन आणि समुद्राच्या खालून

  • 13 किमी प्रवास जमिनीवरुन


बुलेट ट्रेनचा फायद्यात राहण्यासाठी हे गरजेचं

  • एका बुलेट ट्रेनमधून 800 लोक प्रवास करु शकतील

  • एका फेरीसाठी अडीच ते 3 हजार भाडे

  • एका फेरीतून रेल्वेला 24 लाख रुपये मिळतील

  • बुलेट ट्रेन फायद्यात राहण्यासाठी दररोज 88 हजार प्रवासी आवश्यक

  • म्हणजेच दररोज बुलेट ट्रेनच्या किमान 100 फेऱ्या आवश्यक


बुलेट ट्रेनसाठी जपानची मदत

  • बुलेट ट्रेनचा एकूण 1 लाख 10 हजार कोटी

  • जपानकडून 81 टक्के म्हणजेच 88 हजार कोटींचं कर्ज

  • अवघ्या 0.01 टक्के व्याजाने 50 वर्षांसाठी कर्ज, पहिल्या 15 वर्षांसाठी व्याज नाही


शिंजो आबेंकडून मोदींचं कौतुक

पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी देशातील सर्वात पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं गुजरातमधील साबरमतीमध्ये भूमिपूजन केलं.

या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त शिंजो आबे यांनी उपस्थितांसमोर जपानीत भाषणही केलं. त्यांचं हे भाषण हिंदीत भाषांतर करुन सांगण्यात येत होतं. शिंजो आबे भाषणात नेमकं काय म्हणाले यावर एक नजर टाकूयात.

नमस्कार… अशी सुरुवात त्यांनी केली… पण त्यानंतरचं संपूर्ण भाषण त्यांनी जपानीत केलं. ‘बुलेट ट्रेनचा भूमिपूजन सोहळ्यामुळे मला खूप आनंद झाला. यामुळे भारत आणि जपानचे संबंध आणखी दृढ झाले आहे.’ असं सुरुवतीलाच शिंजो आबे म्हणाले.

तसंच यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं.

मोदींकडून शिंजो आबेंचे आभार

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचे आभार मानले. जपानच्या मदतीनेच भारत विकासाचं मोठं पाऊल टाकत असल्याचं मोदींनी नमूद केलं. 1964 मध्येच जपानमध्ये बुलेट ट्रेन सुरु झाली. तेव्हापासून जपानने विकासाचा वेग घेतला आहे. हाच वेग आता भारतही घेईल, असं मोदी म्हणाले.

यावेळी मोदींनी गुजरात आणि महाराष्ट्र सरकारचेही आभार मानले. दोन्ही राज्य मिळून हा प्रकल्प मार्गी लावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे वेळेची आणि पैशाची बचत होईल. हवाई प्रवासाला जेवढा वेळ लागेल, त्यापेक्षा कमी वेळ बुलेट ट्रेनने प्रवासाला लागेल. शिवाय बुलेट ट्रेनमुळे या मार्गावर वाहनांची संख्या घटेल, त्यामुळे इंधन बचत होईल. परिणामी देशाचा पैसा वाचेल, असं मोदी म्हणाले.