बागपत : उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात मोठा अपघात झाला. इथे यमुना नदीत बोट उलटल्याने 19 जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीत 60 पेक्षा जास्त प्रवासी होते.


सध्या पोलिस प्रशासन आणि स्थानिक मदत आणि बचावकार्य करत आहेत. एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आलं आहे.

क्षमतेपेक्षा जास्त लोक बसल्याने दुर्घटना
बागपतमधील काठा गावात सकाळी 7.45 सुमारास हा अपघात झाला. क्षमतेपेक्षा जास्त लोक बोटीत बसल्याने अपघात झाल्याचं कळतं. अपघातानंतर 15 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहापेक्षा जास्त मृतदेह पाण्यातून काढले आहेत.

बोटीत बहुतांश मजूर होते. ते मजुरीसाठी बागपतहून हरियाणाला जात होते.

संतापलेल्या लोकांचा रास्तारोको
अपघातानंतर वेळेत मदत न पोहोचल्याने संतापलेल्या नागरिकांनी दिल्ली-यमनोत्री हायवेवर रास्तारोको केला. तर काही लोकांनी वाहनांची तोडफोडही केली. घटनास्थळी पोहोचलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घातला.

तर पोलिस परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईंकांना आवश्यक ती मदत देण्याचे निर्देश योगी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. शिवाय मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.