अहमदाबाद : देशातील सर्वात पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं आज (गुरुवार) गुजरातमधील साबरमतीमध्ये भूमिपूजन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

1 लाख कोटी रुपये खर्च असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी जपाननं 88 हजार कोटीचं कर्ज दिलं आहे. हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या बीकेसीत बुलेट ट्रेनचं स्टेशन असणार आहे. तिथून अवघ्या तासाभरात टेक्स्टाईल आणि डायमंड हब असलेल्या सूरतला पोहोचता येईल.

दरम्यान काल (बुधवार) जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांना अहमदाबाद विमानतळावर गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून आबे आणि त्यांच्या पत्नीचं पारंपरिक नृत्याने स्वागत करण्यात आलं.

अहमदाबादमध्ये दाखल झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि शिंजो आबे यांच्या रोड शोला सुरुवात झाली. विशेष म्हणजे या रोड शोदरम्यान आबे आणि त्यांच्या पत्नी भारतीय वेशभूषेत दिसले. आठ किमीच्या रोड शोदरम्यान जपानच्या पंतप्रधानांना भारतीय संस्कृतीची विविधता दाखवण्यात आली.

साबरमती आश्रमाजवळ या रोड शोचा शेवट झाला. तिथे नरेंद्र मोदी, शिंजो आबे आणि त्यांच्या पत्नी आकी आबे यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.

काय आहेत या प्रकल्पाची वैशिष्ट्ये-

  • मुंबई अहमदाबाद या 508 किमी अंतरावर ही बुलेट ट्रेन धावेल.

  • यातला 156 किमीचा मार्ग महाराष्ट्रातून, 351 किमी गुजरातमधून आहे

  • या बुलेट ट्रेन मार्गावर एकूण 12 स्टेशन्स असणार आहेत.

  • मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिल्लीमोरा, सुरत, भरुच, बडोदा, आनंद, अहमदाबाद, साबरमती ही ती 12 स्टेशन्स

  • ताशी 350 किमी धावण्याची क्षमता

  • अहमदाबाद-मुंबई अंतर रेल्वेनं पार करण्यासाठी सध्या 7 ते 8 तास लागतात

  • बुलेट ट्रेन हे अंतर तुरळक स्टॉपसह अवघ्या 2 तास 7 मिनिटांत पूर्ण करेल. सर्व स्टॉप घेतले तर हे अंतर 2 तास 58 मिनिटांत पार होणार आहे.

  • एकूण 1 लाख 8 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.

  • सुरक्षा आणि खर्चाच्या दृष्टीनं ही बुलेट ट्रेन एलिव्हेटेड म्हणजे उन्नत मार्गावर करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

  • फक्त मुंबईतले स्टेशन वगळले तर इतर सर्व ट्रॅक हा एलिव्हेटेड असणार आहे.


असा असणार आजचा कार्यक्रम

सकाळी 9.50 वा. – भारतातील पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद-मुंबईचं भूमीपूजन

सकाळी 11.30 वा.  – दांडी कुटिरला भेट

दुपारी 12 वा. – उच्चस्तरीय चर्चा

दुपारी 1. वा – दोन्ही देशात करार आणि पत्रकार परिषद, स्थळ- महात्मा मंदिर

दुपारी 2.30 वा – भारत-जपान बिझनेस लीडर ग्रुप फोटो

दुपारी 3.45 वा – महात्मा मंदिरातील कॉन्व्हेंन्शन हॉलमधील प्रदर्शनाला भेट

रात्री 9.35 वा. – शिंजो आबे टोकियोला रवाना होणार

संबंधित बातम्या :

शिंजो आबेंचं जोरदार स्वागत, अहमदाबादेत आबे-मोदींचा रोड शो

बुलेट ट्रेन ते गिफ्ट सिटी... मुंबईचं महत्त्व कमी करण्यासाठी मोदी सरकारचा डाव?

शिंजो आबे यांच्यासाठी डिनरला गुजराती-जपानी पक्वान्नं