नवी दिल्ली : देशातील जवळपास तीन चतुर्थांश (73 टक्के) संपत्ती केवळ एक टक्के श्रीमंतांकडे एकवटल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे, 2017 या वर्षात भारताला नवे 17 अब्जाधीश मिळाले आहेत, तर दुसरीकडे अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्येच्या संपत्तीत फक्त एका टक्क्याने वाढ झाली आहे. म्हणजे श्रीमंत आणखी श्रीमंत होत आहेत, तर गरीबांच्या संपत्तीत वाढ झालेली नाही.


'ऑक्सफेम'च्या 'रिवॉर्ड वर्क, नॉट वेल्थ' या अहवालात हे निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. ऑनलाईन सर्वेक्षण आणि प्रमाणित आकड्यांच्या आधारे हा अहवाल काढण्यात आला आहे. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये होणाऱ्या विश्व आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे.

भारतीयांच्या संपत्तीशी निगडीत रंजक गोष्टी

2017 मध्ये भारताला 17 नवे अब्जाधीश मिळाले. अब्जाधीशांची संख्या 101 वर. 2000 साली भारतात केवळ 9 अब्जाधीश होते.

अब्जाधीशांची संपत्ती 4 हजार 891 अब्ज रुपयांनी वाढून थेट 20 हजार 676 अब्ज रुपयांवर पोहचली आहे. 4 हजार 891 अब्ज रुपये हे सर्व राज्यातील शिक्षण आणि आरोग्य विभागांच्या बजेटच्या 85 टक्के आहे.

देशातील एकूण संपत्तीच्या तब्बल 73 टक्के रक्कम ही फक्त 1 टक्के श्रीमंतांच्या खात्यात आहे. दुसरीकडे, लोकसंख्येचा 50 टक्के भाग असलेल्या 67 कोटी गरीब जनतेच्या एकूण संपत्तीत केवळ 1 टक्क्याने वाढ झाली आहे.

37 टक्के अब्जाधीशांना वारसाहक्काने संपत्ती मिळाली आहे. अब्जाधीशांकडे असलेल्या एकूण संपत्तीपैकी 51 टक्के रक्कम 'या' (वारसाहक्काने अब्जाधीश झालेल्या 37 टक्के) श्रीमंतांकडे आहे.

महिला अब्जाधीशांची संख्या फक्त 4 असून त्यापैकी तिघींना वारसाहक्काने संपत्ती प्राप्त झाली आहे.

101 अब्जाधीशांपैकी 51 जणांनी वयाची पासष्टी ओलांडली आहे. त्यांच्याकडे एकूण 10 हजार 544 अब्ज रुपये संपत्ती आहे. पुढील 20 वर्षांत ही रक्कम त्यांच्या वारसांकडे गेली, तर त्यांना 30 टक्के दराने वारसा कर (inheritance tax) लावला जाईल. यातून सरकारची 3 हजार 176 अब्ज रुपयांची कमाई होईल. ही रक्कम आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी आणि स्वच्छता, नागरी विकास, श्रम कल्याण विभागात खर्च करण्यासाठी पुरेशी ठरेल.

ग्रामीण भागातील कामगाराला एखाद्या प्रमुख वस्त्रोद्योग कंपनीच्या सीईओच्या वार्षिक वेतनाइतकी रक्कम कमवण्यासाठी 941 वर्ष लागतील.

2018 ते 2022 या कालावधीत देशात रोज नवे 70 लक्षाधीश होतात.