मालदीव : मालदीवच्या (Maldives) परराष्ट्र मंत्रालयाने दावा केला आहे की भारतीय सैनिक मे महिन्यापर्यंत माघारी जाईल. शनिवार 3 फेब्रुवारी रोजी मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारत मालदीवमधून आपले सैन्य मागे घेईल हिंद महासागर द्वीपसमूहात तैनात असलेल्या सुमारे 80 सैनिकांची जागा आता भारतीय नागरिक घेतली.
द्विपक्षीय सहकार्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत झालेल्या सहमतांचा दाखला देत मालदीवने सांगितले की, भारतीय सैनिकांचा पहिला गट 10 मार्चपर्यंत आणि उर्वरित 10 मेपर्यंत देश सोडेल. तसेच आता दोन्ही देशांमधील पुढील द्विपक्षीय बैठक फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात माले येथे होणार असल्याची माहिती देखील यावेळी मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
भारतीय सैनिकांची मोठी मदत
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, दोन्ही देशांनी विमानसेवा सुरु ठेवण्यास सहमती दर्शविली आहे. मात्र, लष्कराच्या माघारीसाठी कोणत्याही कालमर्यादेचा उल्लेख मंत्रालयाने केलेला नाही. भारताचे म्हणणे आहे की, मालदीवमध्ये तैनात भारतीय सैनिक, डझनभर वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह, देशातील दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना मानवतावादी मदत आणि वैद्यकीय उपचार देतात.
मालदीव भारताच्या जवळचा
इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आपला प्रभाव वाढवण्यासाठी सध्या अनेक देश धडपडत आहे. त्याचसाठी चीनने देखील मालदीवला स्वतःकडे आकर्षित केले असल्याचं म्हटलं जातं. भारताच्या शेजारी असल्याने मालदीव अत्यंत जवळ आहे. त्यामुळे मालदीवमध्ये भारतीय सैनिक मालदीवमध्ये तैनात असते. तसेच मालदीवला दोन हेलिकॉप्टर आणि एक डॉर्नियर विमान दिले आहे, जे बहुतेक सागरी निरीक्षण, शोध आणि बचाव कार्य आणि वैद्यकीय सुविधांसाठी वापरले जातात. भारतीय सैनिक त्यांच्या ऑपरेशनचे व्यवस्थापन करतात.
भारत आणि मालदीवच्या संबंधांमध्ये कटुता
पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर त्यांच्या या फोटोंवर मालदीवच्या मंत्र्यांनी टीका केली. या सगळ्यानंतर मालदीव आणि भारतामध्ये बराच तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. अनेकांनी त्यांची मालदीवची ट्रीप देखील रद्द केली. त्यामुळे मालदीवला आर्थिकदृष्ट्या बराच फटका बसला. दरम्यान या सगळ्यामध्ये मालदीव आणि चीनचे देखील संबंध वाढत गेल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे पुन्हा एकदा भारत आणि मालदीवच्या संबंधावर चर्चा सुरु झाली. तर आता मालदीवमधून भारताचे सैन्य देखील माघारी येणार असल्याचं समोर आलं आहे.