भारतीय लष्करासंबधीची माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानकडून नेहमीच वेगवेगळे प्रयत्न केले जातात. पाकिस्तानने यावेळी जवानांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानी एजंटच्या हनी ट्रॅपमध्ये अखेर एक भारतीय जवान अटकला आणि त्याने लष्करासंबधीची माहिती पाकिस्तानला पुरवली.
सोमवीर आणि पाकिस्तानी एजंटमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली होती. सोमवीरला जाळ्यात ओढण्यासाठी पाकिस्तानी एजंटने तिचे अश्लील फोटो त्याला पाठवले होते. त्याबदल्यात सोमवीरने लष्कराशी संबंधित माहिती, टँक, हत्यारे, हत्यारांची वाहने आणि इतर अति संवेदनशील माहिती या महिला एजंटला दिली. त्यानंतर तिने सोमवीरला पाच हजार रुपयेदेखील दिले. आता सोमवीरला चौकशीसाठी जयपूरमध्ये नेले आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक चरण मीना यांनी सांगितले की, "शनिवारी सकाळी सोमवीरला स्थानिक कोर्टात हजर केले होते. त्यानंतर कोर्टाने त्याला 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सोमवीरला ऑफिशियल सीक्रेट्स अॅक्ट 1923 नुसार अटक करण्यात आली आहे."
सोमवीर व्हॉट्सअॅपवरून लष्करासंबंधीची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी पोलीस आणि लष्कराला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांचे एक विशेष पथक आणि लष्कराच्या गुप्तचर विभागाचे अधिकारी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. गुप्तचर विभागाला ठोस माहिती मिळाल्यानंतर सोमवीरवर कारवाई करण्यात आली.
सोमवीरसह अजून 50 जवानांवर गुप्तचर विभागाचा संशय आहे. या जवानांवरेदखील गुप्तचर विभाग आणि पोलिसांचे विशेष पथक लक्ष ठेवून आहे. सोमवीरप्रमाणे हे जवानदेखील हनी ट्रॅपमध्ये अडकले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे हे जवान गुप्तचर विभागाच्या रडारवर आहेत.