नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाहीत, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते संजय सिंह यांनी दिली आहे. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसी येथून निवडणूक लढवली होती. परंतु केजरीवाल यावेळी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे पहायला मिळत आहे. केजरीवाल लोकसभा निवडणूक लढणार नसले तरी, ते नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीमध्ये मोठा उमेदवार उभा करणार हे नक्की आहे असेही सिंह यांनी सांगितेल.


संजय सिंह म्हणाले की, ''अरविंद केजरीवाल यांना सध्या फक्त दिल्लीवर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यामुळे ते लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत.'' परंतु आम आदमी पार्टी वाराणसी येथून मोदींविरोधात तगडा उमेदवार उभा करणार आहे.

2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत केजरीवाल यांनी थेट मोदींना आव्हान दिले होते. परंतु मोठ्या मतफरकाने मोदींनी केजरीवाल यांना धूळ चारली होती.

आम आदमी पार्टी आगामी लोकसभा निवडणुकीत दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि चंदिगड येथील लोकसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवणार आहे. तसेच उत्तर प्रदेशमधील काही जागांवरही आम आदमी पक्ष आपले उमेदवार देणार आहे.