बेळगाव : आज बेळगाव शहरातील कॅम्प परिसरात उभारण्यात आलेल्या पोस्टमनच्या ब्रॉन्झ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. कर्नाटकचे वनमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. पुतळा उभारण्यात आलेल्या चौकाचे 'पोस्टमन सर्कल' असे नामकरणही करण्यात आले.
पोस्ट खात्याचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पोस्टाच्या मुख्य कार्यालयापासून पुतळा बसविलेल्या चौकापर्यंत मिरवणूक काढली. मिरवणुकीच्या अग्रभागी धनगरी ढोल पथक होते. मिरवणुकीत पूर्वीच्या काळातील फेटा घातलेले आणि खाकी गणवेश परिधान केलेले पोस्टाचे कर्मचारी सगळ्यांचे लक्ष वेधून घेते होते.
पोस्टमनचा पुतळा आठ फूट उंचीचा असून त्याचे वजन साडे तीनशे किलो इतके आहे. पुतळ्याचे अनावरण केल्यावर आकाशात फुगे सोडून पोस्टखात्याच्या कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला.
अत्यंत प्रामाणिकपणे ऊन, पाऊस, थंडी, वाऱ्यात सेवा बजावणाऱ्या पोस्टमनच्या सेवेची पोचपावती देण्यासाठी बेळगाव विभागाच्या पोस्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पोस्टमनचा पुतळा उभारण्याची कल्पना मांडली होती. पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः पुतळ्यासाठी वर्गणी काढून निधी जमा केला. कॅन्टोन्मेंट बोर्डानेदेखील त्यास पाठिंबा दिला आणि आज पोस्टमनचा पुतळा उभा राहिला.