NCRB Data :  एका बाजूला सरकारकडून रस्ते सुरक्षा, प्रवाशांच्या सुरक्षितेवर भर दिला जात असताना दुसरीकडे रस्ते अपघातात प्राण (Road Accident Death) गमावणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. वर्ष 2021 मध्ये रस्ते अपघातात  एक लाख 60 हजार भारतीयांना प्राणास मुकावे लागले असल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्याही एका वर्षातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा असल्याचे NCRB ने म्हटले आहे. 


नॅशनल क्राईम रेकोर्ड ब्युरोने (NCRB) वर्ष 2021 ची आकडेवारी जाहीर केली आहे. दर दिवशी सरासरी 426 अथवा प्रत्येक तासाला 18 जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. वर्ष 2020 मध्ये एक लाख 56 हजार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृतांच्या संख्येत दुचाकीस्वार, पादचाऱ्यांची संख्येत वाढ होत असल्याने NCRB ने चिंता व्यक्त केली आहे. सरासरी 100 मृतांमध्ये 44 दुचाकीस्वारांचा समावेश आहे. एकूण 69,240 दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला असल्याचे NCRB ने म्हटले आहे. वर्ष 2019 शी तुलना करता ही संख्या 18 टक्क्यांनी अधिक आहे. 


मृतांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक


देशात सर्वाधिक दुचाकीस्वारांचे मृत्यू तामिळनाडू राज्यात नोंदवण्यात आले आहेत. दुचाकीस्वारांच्या मृतांच्या संख्येत तामिळनाडूमधील प्रमाण 12 टक्के इतके आहे. मागील चार वर्षाच्या आकडेवारीशी तुलना करता रस्ते अपघातातील एकूण मृतांमधील दुचाकीस्वारांचे प्रमाण वाढत आहे. वर्ष 2018 मध्ये हे प्रमाण 35.7 टक्के होते. तर, वर्ष 2021 मध्ये हे प्रमाण 44.5 टक्के इतके झाले आहे. दुचाकीस्वारांची संख्या मात्र, जवळपास स्थिर असल्याचे NCRB ने म्हटले आहे. 


दुचाकीला देशात मोठी पसंती


देशातील अनेक ग्रामीण-शहरी भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे मजबूत जाळे नाही. त्याच्या परिणामी दळणवळणासाठी ग्रामीण-शहरी भागात दुचाकीला प्राधान्य दिले जाते. हेल्मेटचा वापर वगळता दुचाकीस्वारांच्या सुरक्षितेसाठी इतर उपाययोजना नाहीत. 


पादचाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले 


वर्ष 2021 मध्ये 18,900 पादचाऱ्यांना रस्ते अपघातात प्राण गमवावा लागले.  कोरोना महासाथीचे आधीचे वर्ष 2019 शी तुलना करता यामध्ये तब्बल 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रस्ते अपघातातील एकूण मृतांमध्ये वर्ष 2018 मध्ये पादचाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण 6.9 टक्के होते. मागील वर्षी हेच प्रमाण 12.2 टक्के इतके झाले. वर्ष 2021 मध्ये सर्वाधिक पादचाऱ्यांचा मृत्यू बिहारमध्ये नोंदवण्यात आला होता. देशातील एकूण आकडेवारीत बिहारमधील एकूण प्रमाण 15 टक्के इतके राहिले आहे. 


महामार्ग, द्रुतगती महामार्ग, उन्नत महामार्ग बांधण्यावर सरकारचा भर दिसत आहे. या महामार्गांचा वापर चारचाकी आणि अवजड वाहनांकडून केला जातो. मात्र, दुचाकीस्वारांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात आली नसल्याचे जाणकार सांगतात. पादचाऱ्यांच्या सुरक्षितेबाबत फारशा उपाययोजना नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. 


NCRB च्या आकडेवारीनुसार वर्ष 2021 मध्ये 4.22 लाख वाहन अपघातांची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी एक लाख 74 लाखजणांना प्राण गमवावे लागले. रस्ते अपघातात रेल्वे क्रॉसिंगवरील आणि रेल्वेशी संबंधित अपघातांची नोंद केली जाते. मागील वर्षी 18,238 जणांना रेल्वे क्रॉसिंग आणि रेल्वेशी संबंधित अपघातात प्राण गमवावे लागले होते.