नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची आर्थिक स्थिती चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जुलै महिन्यात ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपैया’ अशी झाली आहे. कारण प्रवासभाडं किंवा मालभाड्यातून रेल्वे जेवढे पैसे कमवते, त्यापेक्षा जास्त खर्च करत आहे. भारतीय रेल्वेच्या वित्तीय विभागाच्या आकडेवारीनुसार, 100 रुपये कमवण्यासाठी रेल्वेला 111.51 रुपये खर्च करावे लागतात.


एप्रिल ते जुलैमधील रेल्वेचं ऑपरेटिंग रेशो 111 टक्के आहे. यावरुन स्पष्ट झालेय की, भारतीय रेल्वेचा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेचं ऑपरेटिंग रेशो कायम वर राहिले आहे, मात्र गेल्या 5-6 वर्षांपासून ऑपरेटिंग रेशो 90 टक्क्यांच्या आवती-भोवती फिरताना दिसत आहे. म्हणजे 100 रुपये कमवण्यासाठी 90 रुपये खर्च करावे लागत. आता 2017-2018 या वर्षात भारतीय रेल्वेने ऑपरेटिंग रेशोचं लक्ष्य 92.8 टक्के ठेवलं होतं, मात्र प्रत्यक्षात 96 टक्के होतं.

ऑपरेटिंग रेशो म्हणजे काय?

उत्पन्न आणि खर्च यांची तुलना म्हणजे ऑपरेटिंग रेशो. ऑपरेशनल खर्चाला ऑपरेशनल महसुलातून वजा केले जाते, जेणेकरुन उर्वरीत आकड्यांवरुन रेल्वेची आर्थिक प्रगत अधोरेखित करते. ऑपरेटिंग रेशो जास्त असण्याचा अर्थ असा की, जितकी गुंतवणूक केली गेलीय, तेवढा परतावा मिळाला नाही. आणि जास्त ऑपरेटिंग रेशो असल्यास, त्याचा परिणाम नवे मार्ग उभारणे, नवीन कोच बनवणे किंवा रेल्वेचं आधुनिकीकरण यांसारख्या कामांवर होतो.

कमाईचं लक्ष्य अपूर्णच!

रेल्वेने प्रवाशी तिकिटांमधून एप्रिल ते जुलै या दरम्यान 17,273.37 कोटी रुपयांची कमाई केली. मात्र या महिन्यांमध्ये 17,736.09 कोटींचं लक्ष्य होतं. ते पार करता आले नाही. मालभाड्याबाबतही अशीच स्थिती आहे. एप्रिल-जुलै दरम्यान रेल्वेने मालभाड्याचं लक्ष्य 39,253.41 कोटी रुपये होतं, मात्र प्रत्यक्षात 36,480.41 कोटी रुपये कमाई झाली. रेल्वेच्या वित्तीय विभागाने ही आकडेवारी गोळा केलीय.

रेल्वेची एकूण कमाई किती?

चालू आर्थिक वर्षात रेल्वेची एकूण कमाई 56,717.84 कोटी रुपये आहे. मात्र रेल्वेने एकूण कमाईचं लक्ष्य 61,902.51 कोटी रुपये ठेवले होते.

रेल्वे चालवण्यासाठी किती खर्च येतो?

एप्रिल ते जुलै दरम्यान रेल्वे चालवण्याचा खर्चा 52,517.71 कोटी रुपये इतका आला आणि याच काळात 50,487.36 कोटी रुपये रेल्वेची एकूण कमाई झाली. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रेल्वे चालवण्याच्या खर्चासोबतच इतर खर्च असतात, ज्यामुळे ऑपरेटिंग रेशोमध्ये वाढ होते.

पेन्शन किंवा इतर गोष्टींवरील खर्च

पेन्शन, रेल्वे बोर्डाचा खर्च आणि रेल्वेच्या इतर संस्थांवरील खर्च, हा सारा खर्चही रेल्वे चालवण्याच्या खर्चाशिवाय आहे. त्यामुळे रेल्वेच्या ऑपरेटिंग रेशोवर याचा परिणाम होतो. आणि त्यामुळेच ऑपरेटिंग रेशो 11.51 वर पोहोचलं आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर 47 हजा कोटी रुपये रेल्वेकडून पेन्शन दिले जाते. याचाच अर्थ एप्रिल ते जुलै दरम्यान रेल्वेने जवळपास 12 हजार कोटी रुपये केवळ पेन्शवर खर्च केले.

दरम्यान, रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रेल्वेची कमाई सीझनवर अवलंबून असते. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीतही ही तूट भरुन निघू शकते.