IRCTC Food Service : रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आजपासून रेल्वेत प्रवाशांसाठी शिजवलेलं अन्न मिळणार आहे. कोरोना काळात रेल्वेत शिजवलेल्या अन्नाचा पुरवठा बंद करण्यात आला होता. परंतु, भारतीय रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने आता रेल्वे मंत्रालयाच्या सूचनांनुसार ट्रेनमध्ये शिजवलेलं अन्न देण्याची सुविधा पुन्हा सुरू केली आहे.


गेल्या दोन-अडीच वर्षांपासून कोरोना महामारीमुळे देशभरात अनेक गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले होते. 23 मार्च 2020 पासून खबरदारी म्हणून रेल्वेमधील खान्यापिण्याची सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्यानंतर 5 ऑगस्ट 2020 पासून रेल्वेत जेवण देण्याची सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली होती. परंतु, ही सुविधा ठराविक गाड्यांमध्येच सुरू करण्यात आली होती.  
 
भारतीय रेल्वे प्रवाशांना प्राथमिक सुविधा पुरवत असते. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड हा रेल्वे मंत्रालयाचा सार्वजनिक क्षेत्रातील एक उपक्रम आहे. देशभरातील कोरोना परिस्थिती आता आटोक्यात आली आहे. त्यामुळेच रेल्वेत आता शिजवलेलं अन्न देण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. 


रेल्वे प्रवाशांचे आरोग्य लक्षात घेता पूर्ण खबरदारी घेऊन शिजवलेलं अन्न देण्यात येणार आहे. त्यासाठी भारतीय रेल्वेने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले जाणार आहे. देशभरातील जवळपास 428 रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना शिजवलेलं जेवण दिलं जाणार आहे. 21 डिसेंबर 2021 पासून 30 टक्के रेल्वे गाड्यांमध्ये शिजवलेलं अन्न दिलं जात होतं. त्यानंतर 22 जानेवारी 2022 पर्यंत 80 टक्के गाड्यांमध्ये शिजवलेल्या अन्नाचा पुरवठा केला जात होता. परंतु, आजपासून सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये शिजवलेल्या अन्नाचा पुरवठा केला जाणार आहे.   


महत्वाच्या बातम्या