Hijab Controversy :  हिजाबच्या मुद्यावरुन सध्या देशातील वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. विविध पक्षांचे राजकीय नेते या मुद्यावरुन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. कर्नाटकमध्ये झालेल्या घटनेचे देशभर पडसाद उमटत आहेत. दरम्यान, एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हिजाबच्या मुद्यावरुन आणखी एक मोठं वक्तव्य केले आहे. त्यांनी हिजाबचे समर्थन केले आहे. हिजाब घातलेली महिला ही एक दिवस देशाची पंतप्रधान असेल, असे वक्तव्य ओवेसी यांनी केले आहे.


हिजाब परिधान केलेल्या महिला महाविद्यालयात जातील, जिल्हाधिकारी, दंडाधिकारी, डॉक्टर, व्यवसायिक होतील. मी कदाचित हे पाहण्यासाठी जिवंत नसेन, परंतु माझे शब्द लिहून ठेवा की  एक दिवस हिजाब परिधान केलेली मुलगी या देशाची पंतप्रधान होईल, असे ओवेसी म्हणालेत. त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे, सध्या मोठ्या प्रमाणावर हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. हिजाब प्रकरणामुळे सध्या वातावरण तपले आहे. मुस्लीम मुलींना हिजाब घालून शाळेत प्रवेश देण्यात यावा की येऊ नये, यावरून हा वाद सुरू होता. यावर कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, याचसंदर्भात खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी एका रॅली दरम्यान हे मोठं वक्तव्य केलं आहे. 


प्रकरण नेमकं काय?


कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब परिधान करण्याच्या मुद्यावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना सातत्याने महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभे करण्यात आले. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली. त्याचवेळी या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला. या मुद्यावरुन सध्या देशात वादंग निर्माण झाले आहे. याचे देशात पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्रातही या घटनेचे पडसाद उमटत आहेत.
 


महत्त्वाच्या बातम्या: