नवी दिल्ली : केंद्र सरकार देशातील प्रवासी रेल्वे चालवण्यासाठी खाजगी कंपन्यांसोबत भागिदारी करण्याची योजना आखत आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना प्रवासी रेल्वे चालवण्यासाठी अर्ज मागवले आहेत. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील रेल्वेचं नेटवर्क जवळपास 12 क्लस्टरमध्ये विभागण्यात आलं आहे. यामध्ये 109 अप अँड डाऊन खाजगी रेल्वे मार्गावर 151 मॉडर्न रेल्वे चालवण्याचा विचार आहे. या योजनेंतर्गत 30 हजार कोटी रुपयांची खाजगी क्षेत्राची गुंतवणूक असेल.



काय असेल खाजगी रेल्वेची वैशिष्ट्ये?
प्रत्येक खाजगी रेल्वे किमान 16 डब्यांची असेल. या रेल्वे जास्ती जास्त 160 किमी प्रति तास वेगाने धावतील. या ट्रेनचे रोलिंग स्टॉक खाजगी कंपन्या खरेदी करतील. तसंच यांच्या दुरुस्तीची आणि देखभालीची व्यवस्था खाजगी कंपन्यांची असेल. रेल्वेकडून फक्त ऑपरेटर आणि गार्ड देण्यात येणार आहे. यातील सर्वाधिक रेल्वे मेक इन इंडियाच्या अंतर्गत तयार करण्यात येणार असल्याचे समजते.


भारताकडून चीनला आणखी एक धक्का; यापुढे महामार्ग प्रकल्पात चिनी कंपन्यांना परवानगी नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती


नवीन रोजगाराची निर्मिती
खाजगी कंपन्यांना रेल्वे चालवण्यास परवानगी दिल्याने नव्याने मोठ्या प्रमाणात रोजगारांची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. सोबतचं प्रवाशांच्या प्रवासाच्या खर्च कमी होणार आहे. याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षेसोबतचं त्यांना जागतिक स्तरावरील सुविधा मिळणार असल्याचेही रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे. इतिहासात पहिल्यांदाच रेल्वे मंत्रालयाने खाजगी कंपन्यांना रेल्वे चालवण्याची परवानगी दिली आहे.


अटी आणि शर्थी




  • रेल्वे गाडीतील वातानुकूलित डबे हे मेक इन इंडिया असले पाहिजे.

  • रेल्वे 35 वर्षांसाठी हा प्रोजेक्ट खाजगी कंपन्यांना देईल.

  • रेल्वे विभागाकडून या प्रवासी रेल्वे चालवण्यासाठी ड्रायव्हर आणि गार्ड देण्यात येतील.

  • इतर सर्व व्यवस्था खाजगी कंपन्यांना करावी लागेल. यामध्ये रेल्वे इंजिन देखभाल, दुरुस्ती यांचा समावेश असेल.


Indian Railway | देशात 109 रेल्वे मार्गांवर खासगी रेल्वे सुरु करण्याचा सरकारचा विचार