Indian Navy Day 2023 : आज 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिन साजरा केला जातो. आज सिंधुदुर्ग (Sindhurdurg) येथे नौदल दिन 2023 साजरा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी वारसा याची आठवण करत आदरांजली वाहिली जाणार आहे. छत्रपती शिवरायांनीच भारतीय नौदलाचा पाया रचला. त्याकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारलं. सागरी सुरक्षेला महत्त्व दिलं. याची आठवण म्हणून नौदल दिनानिमित्त भारतीय नौदलाने छत्रपती शिवरायांना ट्रिब्युट देणार खास व्हिडीओ शेअर केला आहे.


नौदल दिनानिमित्त अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील खास व्हिडीओ


दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. आज नौदल दिनानिमित्त नौदलाने आपल्या X हँडलवर म्हणजेच आधीचं ट्विटरवर बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओसह शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ''भारतीय नौसेनेच्या पराक्रमाचा आणि अष्टपैलुत्वाचा साक्षीदार व्हा, कारण ते "जलमेव यस्य, बलमेव तस्य" या प्राचीन मंत्राचे उदाहरण देते, जे भारताच्या समृद्धी आणि कल्याणासाठी आमच्या अदम्य नौसेना सामर्थ्याचे महत्त्वपूर्ण प्रासंगिकतेचे प्रदर्शन करते. आमचा सामुद्री इतिहास आणि शौर्य या आधुनिक दलाच्या भावनेशी जोडणारा व्हिडीओ पाहा. सायंकाळी 4.30 वाजता भारतीय नौदलाच्या युट्युब चॅनलवर लवकरच..


छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण


छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) बांधलेला राजकोट किल्ला (Rajkot Fort) भारताच्या समृद्ध सागरी इतिहासाचा गौरव करतो. सिंधुदुर्गात आज 4 डिसेंबरला नौदल दिनानिमित्त खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची आठवण म्हणून राजकोट किल्ल्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. छत्रपती शिवरायांना अभिवादन करत भारताच्या समुद्री वारसाच्या गौरव करण्यात येणार आहे. 


पाहा व्हिडीओ : जलमेव यस्य, बलमेव तस्य






पंतप्रधानांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, सोमवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी दुपारी 4.15 वाजता सिंधुदुर्गात पोहोचतील. राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहे. त्यानंतर ते सिंधुदुर्गात ‘नेव्ही डे 2023’ सेलिब्रेशन कार्यक्रमात सहभागी होतील. नौदल दिनाच्या खास कार्यक्रमामध्ये विविध प्रात्यक्षिके दाखवली जाणार असून या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींची हजेरी पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान तारकर्ली समुद्रकिनारा, सिंधुदुर्ग येथून भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांची प्रात्यक्षिके पाहणार आहेत.