नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला असून मिग 29 के (MiG 29K) या विमानाने रात्रीच्या अंधारात आयएनएस विक्रांतवर (INS Vikrant) लँडिंग करुन इतिहास रचला आहे. भारतीय नौदलाने या विमानाच्या रात्रीच्या लँडिंगचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हे यश म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'आत्मनिर्भर भारत'च्या दिशेने आणखी एक पाऊल असल्याचं भारतीय नौदलाने स्पष्ट केलं आहे.
MiG-29K जेट हे INS विक्रांतच्या फायटर फ्लीटचा भाग आहे. MiG 29K लढाऊ विमान हे अत्याधुनिक विमान आहे, जे कोणत्याही हवामानात उडू शकते. ते आवाजाच्या दुप्पट वेगाने (ताशी 2000 किमी) उडू शकते. ते स्वतःच्या वजनापेक्षा आठपट जास्त भार वाहून नेण्यास सक्षम आहे. 65000 फूट उंचीवर ते उडू शकते.
रात्रीच्या वेळी विमानवाहू जहाजावर विमान उतरवणे नौदलासाठी आव्हानात्मक मानले जाते. कारण विमानवाहू वाहक 40-50 किमी/ताशी वेगाने पुढे जात असते आणि वैमानिकांना जेटच्या वेगाशी ताळमेळ राखावी लागते.
यापूर्वी तेजस विमानाने आयएनएस विक्रांतवर यशस्वीपणे उतरण्याची कामगिरी केली होती, मात्र तेजस विमानाचं लँडिंग हे दिवसा करण्यात आलं होतं. याशिवाय 28 मार्च रोजी कामोव 31 हेलिकॉप्टरही आयएनएस विक्रांतवर उतरवण्यात आले होते.
मिग-29 के लँडिंगबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, "आयएनएस विक्रांतवर मिग-29 के पहिल्या रात्रीच्या लँडिंगची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल मी भारतीय नौदलाचे अभिनंदन करतो. ही उल्लेखनीय कामगिरी म्हणजे विक्रांत क्रू आणि नौदलाच्या वैमानिकांच्या कौशल्य, दृढता आणि व्यावसायिकतेची साक्ष आहे."
INS विक्रांत पहिली स्वदेशी विमानवाहू नौका
INS विक्रांत ही भारतात बांधलेली, स्वदेशी पहिली विमानवाहू नौका आहे. ही नौका केरळमधील कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) मध्ये बांधण्यात आली होती. या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेचे नाव भारतातील पहिल्या विमानवाहू वाहक INS विक्रांतच्या नावावरून ठेवण्यात आले. 45,000 टनाची INS विक्रांत 20,000 कोटी रुपये खर्चून बांधली गेली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ती नौदलात सामील झाली होती.
Characteristics of the MiG-29K aircraft : MiG-29K विमानाची वैशिष्ट्ये
MiG-29K विमाने पुढील 10-15 वर्षे प्रभावी राहतील असे मानले जाते. परंतु भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातील त्यांची संख्या कमी होत आहे ही मोठी समस्या आहे. हवाई दलात सध्या मिग-29 के चे 32 स्क्वॉड्रन्स आहेत आणि लष्कराला त्याची कमतरता भासत आहे.
MiG-29K हे चौथ्या पिढीचे हायटेक विमान आहे जे नौदलाच्या हवाई संरक्षण मोहिमेत अतिशय प्रभावी आहे. कोणत्याही हवामानात समान क्षमतेने काम करणारी ही विमाने समुद्र आणि जमिनीवर सारखीच हल्ला करू शकतात.
MiG-29K मध्ये मल्टी फंक्शनल डिस्प्ले (MFD), डिजिटल स्क्रीन आणि ग्लास कॉकपिट आहे. आधी विकत घेतलेली आवृत्ती नंतर अपग्रेड केली गेली आहे ज्यामुळे त्याची फायर पॉवर देखील वाढली आहे. आता MiG-29K हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर आणि जहाजविरोधी मोहिमाही पार पाडू शकते. म्हणजेच ते समुद्रातही हल्ला करण्यास सक्षम आहे.
मिग-29 के रशियन विमानवाहू वाहक अॅडमिरल गोर्शकोव्हवर तैनात करण्यात आले होते. नंतर भारताने ते विकत घेतले आणि 2010 मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री एके अँटनी यांच्या उपस्थितीत ही लढाऊ विमाने नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली होती.
दोन दशकांहून अधिक प्रतीक्षेनंतर मिग-29 के नौदलाच्या ताफ्यात सामील झाले. यापूर्वी नौदलाने 'शॉर्ट टेक ऑफ अँड व्हर्टिकल लँडिंग' (एसटीओव्हीएल) 'सी हॅरियर्स' खरेदी केली होती जी ऐंशीच्या दशकात ब्रिटिशांनी बनवलेली लढाऊ विमाने होती.
MiG-29K मध्ये बसवलेल्या शस्त्रांमध्ये A-A, A-S मिसाईल, गायडेड एरियल बाँब, रॉकेट, हवाई बॉम्ब आणि 30 मिमी कॅलिबर एअर गन यांचा समावेश आहे.
MiG-29K हाय-टेक टार्गेट आणि नेव्हिगेशन सिस्टम, क्वाड-रिडंडंट फ्लाय-बाय-वायर फ्लाइट कंट्रोल सिस्टम, रडार आणि ऑप्टिकल लोकेटिंग स्टेशन, हेल्मेट-माउंटेड टार्गेट/डिस्प्ले सिस्टम, कम्युनिकेशन-सेल्फ-डिफेन्स इक्विपमेंट, कॉकपिट इन्स्ट्रुमेंटेशनसह सुसज्ज आहे. उच्च उड्डाण सुरक्षा, शस्त्रांचा प्रभावी वापर तसेच नेव्हिगेशन आणि प्रशिक्षणाची कामे हाताळण्यात या विमानाची मोठी भूमिका आहे.
ही बातमी वाचा: