Indian National Congress : आज राष्ट्रीय काँग्रेसचा (Indian National Congress) 138 वा स्थापना दिवस आहे. 28 डिसेंबर 1885 रोजी ब्रिटीश अधिकारी एलेन ओक्टेवियन ह्यूम (Allan Octavian Hume), दादाभाई नौरोजी (Dadabhai Naoroji) आणि दिनशा वाचा (Dinshaw Wacha) यांनी काँग्रेसची स्थापन केली. मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील 72 प्रतिनिधी एकत्र आले होते. या सर्वांनी मिळून काँग्रेसची स्थापना केली. स्वातंत्र्यलढ्यापासून आधुनिक भारताच्या निर्मितीपर्यंतच्या प्रवासात काँग्रेसचा मोलाचा वाटा आहे. 


काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबईत


काँग्रेसचे  पहिले अधिवेशन मुंबई येथील गोवालिया टॅंकजवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत दुपारी बारा वाजता भरले होते. फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, दिनशा वाचा, न्या. रानडे, बद्रुद्दीन तय्यबजी, रा. गो. भांडारकर, के. टी. तेलंग, पी. आनंद चार्ल्, एस्. सुब्रमण्यम् अय्यर, दिवाणबहादूर रघुनाथराव, केशव पिल्ले, एन्. जी. चंदावरकर, गो. ग. आगरकर आदी मंडळी या अधिवेशनाला उपस्थिती होती. 


व्योमेशचंद्र बॅनर्जी काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष


पूर्वनियोजित राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 22 डिसेंबर 1885 ला पुण्यात घेतले जाणार होते. मात्र, पुण्यात कॉलराची साथ सुरू असल्यामुळं हे अधिवेशन मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत घेतले गेले. राष्ट्रीय काँग्रेसच्या या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कलकत्त्याचे ख्यातनाम वकील व्योमेशचंद्र बॅनर्जी हे होते. या अधिवेशनात कॉंग्रेसचे संघटनासूत्र ठरवण्यात आले. पारशी समाजाचे विचारवंत, शिक्षणतज्ञ, व्यापारी आणि समाजसुधारक दादाभाई नौरोजी हे 1886 आणि 1893 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष होते. 1887 मध्ये बदरुद्दीन तैयबजी आणि 1888 मध्ये जॉर्ज यूल हे काँग्रेसचे पहिले इंग्रज अध्यक्ष झाले. 1889 ते 1899 पर्यंत विल्यम वेडरबर्न, सर फिरोजशाह मेहता, आनंदचारलू, अल्फ्रेड वेब, राष्ट्रगुरु सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आगा खान यांचे अनुयायी रहमतुल्ला सयानी, स्वराज अधिवक्ता सी शंकरन नायर, बॅरिस्टर आनंदमोहन बोस आणि सिव्हिल ऑफिसर रोमेशचंद्र दत्त काँग्रेस अध्यक्ष राहिले.


1924 ला महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली बेळगावमध्ये अधिवेशन 


महात्मा गांधी हे 1915 साली आफ्रिकेतून भारतात आले. त्यानंतर गांधींचा राजकारणात प्रभाव दिसू लागला. 1920 ते 1947 या भारताच्या स्वातंत्र्यादरम्यानचा हा कालखंड विचारात घेतला तर या काळातील पहिले काँग्रेस अध्यक्ष पंजाब केसरी लाला लजपत राय होते, ज्यांनी 1920 च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले होते. 1924 मध्ये बेळगावचे अधिवेशन महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली झाले. येथूनच काँग्रेसच्या ऐतिहासिक स्वदेशी, सविनय कायदेभंग आणि असहकार चळवळीचा पाया घातला गेला. अध्यक्ष नसतानाही गांधींचा प्रभाव कायम होता. गांधींचे अनुयायी जवाहरलाल नेहरू हे प्रत्यक्षात 1929 मध्ये पहिल्यांदा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 


महत्मा गांधींच्या हत्येनंतर नेहरु युग


भारतीय राजकारणावर गांधींचा प्रभाव अजूनही आहे. पण, त्यांच्या हत्येनंतर काँग्रेसचे नेहरू युग सुरू झाले. पहिले पंतप्रधान झालेल्या नेहरूंच्या काळात, ज्या वर्षी राज्यघटना लागू झाली, म्हणजेच 1950 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष होते साहित्यिक पुरुषोत्तमदास टंडन. नेहरू स्वतः 1951 ते 1954 पर्यंत अध्यक्ष होते. नेहरु युगात 1959 मध्ये पहिल्यांदा काँग्रेस अध्यक्ष झालेल्या इंदिरा गांधी नंतरही काँग्रेसच्या अध्यक्षाही होत्या. 1960 ते 63 पर्यंत, नीलम संजीव रेड्डी, के कामराज, ज्यांना नेहरूंच्या मृत्यूनंतर 1964 ते 67 पर्यंत किंगमेकर म्हटले गेले होते, ते काँग्रेसचे अध्यक्ष होते. 1964 मध्ये  पंडीत जवाहरलाल नेहरूंचा मृत्यू झाला.   


1966 मध्ये इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान 


1966 मध्ये इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. कामराज यांच्याशी त्यांचा सत्तासंघर्ष खूप गाजला. इंदिरा गांधींच्या प्रभावाच्या काळात 1968-69 मध्ये निजलिंगप्पा, 1970-71 मध्ये बाबू जगजीवन राम, 1972-74 मध्ये शंकर दयाळ शर्मा आणि 1975-77 मध्ये देवकांत बरुआ काँग्रेसचे अध्यक्ष होते. 1977 ते 78 च्या दरम्यान केबी रेड्डी यांनी काँग्रेसला सांभाळले. पण, आणीबाणीनंतर काँग्रेसमध्ये फूट पडली आणि 1978 मध्ये त्या स्वतः इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या. 1984 मध्ये त्यांच्या हत्येपर्यंत इंदिराजी थोडा काळ सोडला तर त्याच अध्यक्ष राहिल्या. 


इंदिरा गांधींची हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान 


1984 मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली. त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. 1985 मध्ये राजीव गांधी काँग्रेसचे अध्यक्षही झाले. राजीव गांधी यांनी आधुनिक युग सुरू केले. कॉम्प्युटर भारतामध्ये आणून भारताची क्रांती घडवण्यामध्ये राजीव गांधी यांचा मोठा हात आहे. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं 401 जागा जिंकल्या होत्या. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी चेन्नई येथील श्रीपेरंबदुर येथे आत्मघाती बॉम्बस्फोटामुळे हत्या झाली. राजीव गांधींची हत्या झाली तेव्हा काँग्रेससमोर अध्यक्षाबाबत संकट उभे राहिले होते. कारण सुरुवातीला सोनिया गांधी यांनी सक्रिय राजकारणात येण्यास स्वारस्य दाखवले नाही. पी व्ही नरसिंह राव यांनी 1992 ते 96 या काळात काँग्रेसचे नेतृत्व केले. 1996 ते 98 या काळात गांधी घराण्याचे निष्ठावंत मानले जाणारे सीताराम केसरी यांनी नेतृत्व केले. 


1998 ते 2017 पर्यंत सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा


राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधींनी सक्रिय राजकारणात पदार्पण केले. 1998 ते 2017 पर्यंत सोनिया गांधी जवळपास 20 वर्षे काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. 2017 मध्ये राहुल गांधी यांना पक्षाची धुरा सोपवण्यात आली होती. त्यानंतर काही काळ राहुल गांधी हे देखील काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते. मात्र, 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले. सध्या  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  मल्लिकार्जून खर्गे हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खर्गेंनी स्वीकारला काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार, सोनिया गांधींनी केलं अभिनंदन