Weather Report : देशातील अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस (Hevay rain) कोसळताना दिसत आहे. नदी नाल्यांना पूर आल्यानं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. उत्तर भारतातही चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, शेतीकामांना वेग आला आहे. दरम्यान, आज हवामान विभागाकडून काही राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये गुजरातमधील (Gujarat) काही जिल्हे आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) काही जिल्ह्यांचा समावेश आहे.
 
भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान खात्याने आज गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. यामध्ये अमरेली, गीर सोमनाथ, नवसारी, डांग, वलसाड जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे जुनागढ, भावनगर, सूरत, तापी जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.


महाराष्ट्रात पावसाचा रेड अलर्ट


हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आजही पाऊस सुरुच राहणार आहे. बुधवारी मुसळधार पावसामुळे नाशिकमधील अनेक भागात पाणी साचले होते. दरम्यान, आज नाशिक, पालघर आणि पुणे जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.



कर्नाटकातील काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी


आज हवामान खात्याने उत्तर गोवा, दक्षिण गोव्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच कर्नाटकातील काही जिल्ह्यांना अजूनही दिलासा मिळालेला नाही. तेथील उत्तरा कन्नड, उडुपी, शिमोगा, दक्षिण कन्नड, चिकमंगलूर आणि कोडागु जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.


मध्य प्रदेशमध्येही ऑरेंज अलर्ट 


मध्य प्रदेशातील धार, देवास, सीहोर, रायसेन, होशंगाबाद जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यासोबतच शेजारच्या छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव, बालोद, कांकेर, नारायणपूर, विजापूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात सध्या मुसळधार पावसामुळं पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.


दरम्यान, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्याचवेळी उत्तराखंडच्या विविध भागात 14, 16 आणि 17 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात आज आणि उद्या मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.


महत्वाच्या बातम्या: