PM Narendra Modi Visit UP : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (16 जुलै) उत्तर प्रदेशाला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन करणार आहेत. या द्रुतगती महामार्गाचे काम 28 महिन्यात पूर्ण झाले असून आता त्याचे उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. 29 फेब्रुवारी 2020 रोजी बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाच्या कामाची कोनशीला ठेवली होती. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता जालौन जिल्ह्यातील उरईमधील कैथेरी गावात बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन होणार आहे. देशभरात दळणवळणाच्या सुविधा वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे आणि  रस्तेविषयक पायाभूत सुविधा सुधारण्याची कामे हाती घेणे हा यातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पंतप्रधानांच्या हस्ते 29 फेब्रुवारी 2020 रोजी बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाच्या कामाची कोनशीला रचणे हा या दिशेने केलेला महत्त्वाचा प्रयत्न होता. या द्रुतगती महामार्गाचे काम 28 महिन्यात पूर्ण झाले असून आता त्याचे उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. 






यूपीईआयडीए अर्थात उत्तर प्रदेश द्रुतगती महामार्ग औद्योगिक विकास प्राधिकरणाच्या देखरेखीखाली सुमारे 14,850 कोटी रुपये खर्चाच्या या चौपदरी 296 किलोमीटर लांबीच्या द्रुतगती महामार्गाची उभारणी करण्यात आली आहे.  पुढील काळात या महामार्गाचा विस्तार करून हा मार्ग सहापदरी देखील करता येऊ शकेल. हा  द्रुतगती महामार्ग  चित्रकूट जिल्ह्यातील भरतकूपजवळील गोंडा गावातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 35 पासून इटावा जिल्ह्यातील कुद्रैल गावापर्यंत आहे आणि या गावाजवळ हा महामार्ग आग्रा-लखनौ द्रुतगती महामार्गाला जाऊन मिळतो. हा द्रुतगती महामार्ग चित्रकूट, बांदा, महोबा,हमीरपुर, जालौन, ऑरैय्या आणि इटावा या सात जिल्ह्यांमधून जातो.