Zakir Naik: फरार झाकीर नाईकवर चारही बाजूंनी कोंडी करण्यासाठी भारत सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. अशातच भारताने ओमान सरकारला झाकीर नाईकला देशात येऊ देऊ नये, अशी विनंती केली आहे. त्याच्याविरुद्ध प्रत्यार्पणाची विनंती मलेशिया सरकारकडे प्रलंबित आहे. झाकीर नाईकचे 23 आणि 25 मार्च रोजी ओमानमध्ये दोन कार्यक्रम होणार आहेत. याबाबत भारताने ओमान सरकारशी चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सूत्रांच्या हवाल्याने असेही सांगण्यात येत आहे की, झाकीर नाईक सध्या ओमानमध्ये नाही. काही वर्षांपूर्वी वादग्रस्त इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईकवर भारतात कारवाई सुरू झाली तेव्हा त्याने इथून पळ काढला आणि परदेशात फरार झाला आहे. भारतातून पळून तो आधी ब्रिटनला गेला. जेथे त्याच्या वागणुकीमुळे सरकारने त्याच्या प्रवेशावर बंदी घातली. त्यानंतर झाकीर मलेशियामध्ये गेला. गेल्या तीन वर्षांपासून त्याने मलेशियाला आपला तळ बनवला आहे.
India On Zakir Naik: झाकीरविरोधात रेड कॉर्नर नोटीस
भारतीय तपास यंत्रणा मागील काही वर्षांपासून झाकीर नाईक याच्या मागावर आहे. झाकीरवर भारतात देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्यापूर्वी आणि रेड कॉर्नर नोटीस जारी होण्यापूर्वीच तो देश सोडून मलेशियाला पळून गेला. तिथे तो सरकारी कार्यालये आणि निवासी इमारतींसह व्हीआयपी परिसरात राहू लागला.
India On Zakir Naik: परराष्ट्र मंत्रालयाने काय सांगितले?
झाकीर नाईक एकदा कतारमध्ये फिफा विश्वचषकादरम्यान दिसला होता. त्यावेळी परराष्ट्र मंत्रालयाचे एक वक्तव्य समोर आले होते. ज्यामध्ये परराष्ट्र मंत्रालयाने तो फरार असल्याचे म्हटले होते. त्याला भारतात परत आणण्यासाठी आम्ही मलेशियाशी चर्चा करत आहोत, असं सांगितलं गेलं होतं. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, “झाकीर नाईक आमच्या कायदेशीर व्यवस्थेतील आरोपी आहे. मलेशियातून त्याचे प्रत्यार्पण व्हावे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.” ते पुढे म्हणाले की, भारताने फिफा विश्वचषकासाठी नाईकच्या निमंत्रणाचा मुद्दा कतारसमोर उपस्थित केला होता. प्रत्युत्तरात कतारने नाईकला निमंत्रण दिले नसल्याचे सांगितले होते. यासोबतच नाईक याला भारतात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील, असा दावा बागची यांनी केला. दरम्यान, नाईक 2016 मध्ये भारत सोडून मलेशियाला गेला होता. भारताने मलेशियाकडे त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती केली आहे.
इतर महत्वाची बातमी: