Aadhaar System : प्रत्येक ठिकाणी पुरावा म्हणून आधार कार्डचा (Aadhar Card) वापर केला जातो. शाळेतील अॅडमिशनपासून ते रेशन कार्डपर्यंत अन् प्रत्येक सरकारी कामासाठी अथवा योजनासाठी आधारकार्ड लागतेच. आधारकार्ड सध्या देशातील प्रत्येक नागरिकासाठी महत्वाचा पुरावा झालाय. पण आधारकार्डमध्ये अनेक उणिवा असल्याचे दिल्ली पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. आधार कार्डमधील या उणिवामुळेच अनेक स्कॅमर्स, गुन्हेगार अनेकांची फसवणूक करतात, असे दिल्ली पोलिसांना तपासात समोर आले आहे. एका सायबर फ्रॉड प्रकरणाचा तपास करताना दिल्ली पोलिसांना आधार कार्डमधील त्रुटीची माहिती मिळाली. ज्यामध्ये आधार सिस्टम एखाद्या व्यक्तीसाठी आयडी तयार करताना चेहऱ्यावरील बायोमेट्रिक्सशी जुळत नव्हती.


12 बँक खात्याच्या आधारकार्डवर एकच फोटो


दिल्ली पोलिसातील एका अधिकाऱ्याने सांगितले, आधार डेटाबेसच्या व्हेरिफिकेशननंतर 12 बँक खाती वेगवेगळ्या लोकांच्या नावाने डिजिटल पद्धतीने उघडण्यात आलेली आहेत. या 12 बँक खात्यासाठी देण्यात आलेल्या सर्व आधारकार्डवर एकाच व्यक्तीचा फोटो आहे. असाच प्रकार अनेक आधारकार्डमध्ये झाला असेल, असे या प्रकरणामुळे संशय व्यक्त करण्यात येत आहे. 


UIDAI नुसार, सर्व आधार कार्डमध्ये बोटांचे ठसे वेगवेगळे आहेत. पण फोटो एकसारखा आहे. अधिकृत एजंट्सच्या क्रेडेन्शियल डेटाचा वापर करुन अशाप्रकारे गैरकृत्य करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात आढळून आले. ज्याने त्याच्या सिलिकॉन फिंगरप्रिंट आणि IRIS स्कॅनचे प्रिंटआउट दिले. त्याशिवाय कॉन्फिगरसाठी लॅपटॉपही देण्यात आला होता, असे अधिकाऱ्याने सांगितले. 


GPS ट्रॅकिंगलाही हुलकावणी


अधिकृत एजेंट फक्त सरकारी संस्था अथवा निर्धारित जागेवरुनच लॉग इन करु शकतात. त्यांच्या सिस्टमला जीपीएसद्वारे कॅप्चर करण्यात येते. GPS सिस्टमला हुलकावणी देण्यासाठी त्यांनी दोन तीन दिवसांत कॉन्फिगर केलेला लॅपटॉप नेला. त्यानंतर सरकारी कार्यालयात मशीनचा वापर केला. त्यामुळेच मशीनमध्ये पुढील दोन ते तीन दिवसासाठी सरकारी कार्यालयाचे जीपीएस सिस्टम दिसले. त्याशिवाय आधार सिस्टम एखाद्या व्यक्तीच्या सिलिकॉन फिंगरप्रिंट आणि लाइव्ह फिंगरप्रिंट यामधील अंतर समजू शकले नाही. याचाच फायदा स्कॅमर्स घेत आहेत.  एजंटमार्फत दिलेल्या सिलिकॉन फिंगरप्रिंटचा वापर करण्यासाठी UIDAI सिस्टमचा वापर केला जातो, असे UIDAI ने सांगितले. 


IRIS स्कॅनला दिला चकवा -


UIDAI सिस्टम IRIS स्कॅनच्या कॉपी शोधण्यात अक्षम आहे. IRIS स्कॅन एक बायोमेट्रिक फिचर आहे. या फिचरमुळे एखादा जिवंत सिस्टममध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजते. पण स्कॅमर्सनी मोठ्या शिताफीने IRIS च्या कलर प्रिंटआउटचा वापर केला. ज्यामुळे सिस्टम याला ट्रॅक करु शकले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कॅमर्स UIDAI च्या डेटाबेसमध्ये 12 संस्थाची माहिती एडिट आणि अपलोड करण्यासाठी सक्षम होतात. UIDAI सिस्टम डेटाबेसमधील चेहऱ्यावरील बायोमेट्रिक डेटाशी जुळत नाही आणि घोटाळेबाजांनी याचाच फायदा घेतला. 


आधारच्या त्रुटीचा घोटाळेबाज घेतायेत फायदा 


दिल्ली पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की,  आधार कार्ड अधिकार्‍यांशी या प्रकरणावर चर्चा झाली.  त्यात असे आढळून आले की, आधार सिस्टमने एका व्यक्तीच्या 10 फिंगरप्रिंट्सना एकच ओळख दिली आहे. दहा बोटांना वेगवेगळी ओळख दिली नाही. फसवणूक करणाऱ्यांना याची माहिती होती आणि त्यांनी फिंगरप्रिंट्स बदलून किंवा एका व्यक्तीचे फिंगरप्रिंट दुसऱ्या व्यक्तीसोबत मिसळून आधार कार्ड तयार केले.