Indian Army : काश्मीरमध्ये (Kashmir) प्रचंड बर्फवृष्टी सुरू आहे. जम्मू-काश्मीरमधील बर्फाच्या वादळात भारतीय सैनिक (Indian Army) स्थानिक लोकांसाठी देवदूत बनले आहेत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या मदतीसाठी अहोरात्र झटत आहेत. अशातच  भारतीय लष्कराच्या जवानांनी एका गरोदर महिलेला (Pregnant Woman) अशाच कठीण परिस्थितीतून बाहेर काढत तिचे प्राण वाचवले. काय घडले नेमके?


 


काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे रस्ते पूर्णपणे ठप्प
भारतीय लष्कराच्या जवानांनी एका गर्भवती महिलेचे प्राण वाचवले आहेत. काश्मीरमध्ये अति बर्फवृष्टीमुळे रस्ते पूर्णपणे ठप्प झाले असून नागरी रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचू शकत नव्हत्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भारतीय लष्कर तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि गर्भवती महिलेचे प्राण वाचवले. ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 


 







एका आशा कार्यकर्त्याचा लष्कराला फोन आला...
लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 29 डिसेंबर 2022 च्या रात्री 8.30 वाजता दमणी येथील एका आशा कार्यकर्त्याचा लष्कराला फोन आला. यामध्ये गंभीर अवस्थेत असलेल्या गर्भवती महिलेला तातडीने वैद्यकीय मदत मागवण्यात आली. अति बर्फवृष्टीमुळे रस्ते पूर्णपणे बंद झाल्याने रुग्णवाहिका त्या भागात पोहोचू शकल्या नाहीत. परिस्थितीचे गांभीर्य पाहून कालरूस प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय व बचाव पथके तातडीने गावात पाठवण्यात आली. 29 डिसेंबर 2022 च्या रात्री भारतीय लष्कराने उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील दमानी गावात एका गर्भवती महिलेला भर बर्फवृष्टीत एका खाटेवर बसवून रुग्णालयात पोहोचवले. जिथे या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. 


 


कुटुंबीय आणि डॉक्टरांकडून कृतज्ञता व्यक्त
भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीच्या जन्मानंतर लगेचच महिलेला त्रास होत होता, त्यावेळी तिला ताबडतोब एसडीएच कुपवाडा येथे नेण्याची गरज होती. लष्कराचे पथक अगोदरपासूनच या भागात हजर होते. बर्फवृष्टीमुळे रस्ता बंद झाल्यावर लष्कराच्या जवानांनी पीडित गर्भवती महिलेला पुन्हा एका वाहनात कुपवाडा रुग्णालयात नेले. महिला आणि बालक दोघेही सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. लष्कराच्या तत्पर कारवाई आणि वेळीच मदत केल्याबद्दल कुटुंबीय आणि डॉक्टरांनी कृतज्ञता व्यक्त केली.


 


बारामुल्लामध्येही गर्भवती महिलेचा जीव वाचला
याआधी बारामुल्लामध्ये बीएसएफ जवानांमुळे गर्भवती महिलेचा जीव वाचला होता. मुसळधार बर्फवृष्टीमध्ये तीव्र वेदना सुरू झाल्याने गर्भवती महिलेचे कुटुंबीय सुरुवातीला घाबरले. पण, बीएसएफच्या जवानांनी त्यांना शांत केले आणि नंतर जीव धोक्यात घालून महिलेला रुग्णालयात नेले.


 


कुपवाडामध्ये एका वृद्धाचा जीव वाचवला 
लालपोरा येथे प्रचंड बर्फवृष्टीमध्ये अडकलेल्या 75 वर्षीय गुलाम नबी गनी यांना वाचवण्यासाठी लष्कराच्या जवानांनी बर्फातून चालत 2 किलोमीटरचे अंतर कापले. कुपवाडा येथे कडाक्याच्या थंडीत बर्फात अडकलेल्या गनीपर्यंत सैन्य पोहोचले, तेव्हा त्यांची प्रकृती चिंताजनक होती. यानंतर लष्कराच्या जवानांनी गनीला उचलून प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) नेले. यासंबंधीचा व्हिडीओ भारतीय लष्कराच्या चिनार क्रॉप्सने शेअर केला आहे.