Operation Sindoor : याचना नहीं, अब रण होगा! राष्ट्रकवी दिनकरांच्या कवितेचा आधार अन् भारताचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा
India Attack On Pakistan : आमचा लढा हा दहशतवाद्यांशी होता, पण पाकिस्तान त्यांच्या मदतीला आल्यानं पाकिस्तानला धडा शिकवावा लागला असं एअर मार्शल ए.के. भारती यांनी सांगितलं.

मुंबई : याचना नहीं, अब रण होगा! जीवन-जय, या कि मरण होगा! दुर्योधनाच्या अहंकारापुढे काहीच चाललं नसल्याने श्रीकृष्णाने दुर्योधनला हा इशारा दिला आणि पुढे महाभारत घडलं. आताही तसंच काहीसं घडण्याची शक्यता आहे. पण यावेळी पांडव-कौरव आमनेसामने नाहीत तर ते आहेत भारत आणि पाकिस्तान. भारतीय लष्कराने एक पत्रकार परिषद घेत राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर (Ramdhari Singh Dinkar) यांच्या रश्मिरथी कवितेचा (Rashmirathi) आधार घेतला आणि पाकिस्तानला इशारा दिला. यापुढे चर्चेचं गुऱ्हाळ थांबणार आणि पाकिस्तान, त्याच्या दहशतवादाला थेट भिडून नष्ट करणार असे स्पष्ट संकेत भारतीय लष्कराने दिले.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर देत त्याच्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले. त्यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. त्यानंतरही भारताचे ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरुच असणार असं भारताने स्पष्ट केलं. त्याचीच माहिती देण्यासाठी भारतीय लष्कराने एक पत्रकार परिषद घेतली.
Ramdhari Singh Dinkar Rashmirathi : रश्मिरथी कवितेचा लष्कराकडून संदर्भ
भारताचे एअर मार्शल ए.के. भारती यांनी राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या कवितेतील एका ओळीचा संदर्भ दिला. 'याचना नहीं, अब रण होगा! जीवन-जय, या कि मरण होगा!' असं म्हणत त्यांनी भारतीय लष्कर आता पाकिस्तानला पूर्ण सामर्थ्याने उत्तर देणार असल्याचं स्पष्ट केलं.
आमचा लढा दहशतवाद्यांशी होता. आम्हाला पाकिस्तानी वायुदलावर हल्ला करायचा नव्हता, पण पाक लष्कर दहशतवाद्यांच्या मदतीसाठी उतरला असं भारतीय वायुदलाचे एअर मार्शल ए.के.भारती म्हणाले. भारताच्या वायुदलाला जराही हानी पोहोचलेली नाही, आपले सर्व वायुदल तळ आणि तिथली यंत्रणा कार्यान्नवित आहे असं देखील एअर मार्शल भारती म्हणाले.
राष्ट्रकवी दिनकर हे मूळचे बिहारचे असून सध्याचे एअर मार्शन ए. के. भारती हेदेखील बिहारचे आहेत. दिनकर यांनी त्यांच्या 'रश्मिरथी' कवितेतून महाभारतातील प्रसंग उभा केला आहे.
Indian Army PC : महाभारतातील तो प्रसंग काय?
कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्ध होऊ नये यासाठी श्रीकृष्ण पांडवांच्या वतीने चर्चा करण्यासाठी कौरवांकडे जातो. हस्तिनापूरच्या साम्राज्याचा अर्धा हिस्सा जर देऊ शकत नसाल तर पांडवांना पाच गावं द्यावीत, त्यात ते समाधानी होतील असं श्रीकृष्ण दुर्योधनाला सांगतो.
पाच गावं काय, सुईच्या टोकावर मावेल इतकी जमीनही देणार नाही असं अहंकारी दुर्योधन श्रीकृष्णाला सांगतो. तसेच तो श्रीकृष्णाला बेड्या घालण्याचे आदेशही सैनिकांना देतो. त्याचवेळी श्रीकृष्ण त्याचे रौद्र रुप दाखवतो आणि कौरवांना निर्वाणीचा इशारा देतो.
Rashmirathi Poem : याचना नहीं, अब रण होगा!
"जंजीर बढ़ा कर साध मुझे, हाँ, हाँ दुर्योधन! बाँध मुझे। असं म्हणत श्रीकृष्ण त्याचे विराट रुप दाखवतो. आकाश, वारा, सर्व सृष्टी आणि त्यातील सर्व गोष्टी आपल्या विराट रूपात विलीन असल्याचं सांगतो. असा कोणताही साखळदंड नाही जो आपल्याला बांधू शकेल याचा प्रत्यय श्रीकृष्ण दुर्योधनाला देतो.
याचना नहीं, अब रण होगा! जीवन-जय, या कि मरण होगा! यापुढे कोणतीही चर्चा होणार नाही, फक्त आणि फक्त युद्धच होईल असा इशारा श्रीकृष्ण कौरवांना देतो.
या कवितेतील कृष्णाचे विराट रूप आणि त्यातील सृष्टीची अखंडता दर्शविणारे हे काव्यांश दुर्योधनला त्याच्या अहंकाराचा इशारा देणारा आणि त्याच्या कर्मांचा परिणाम समजावण्यासाठी आहे.
आकाशे शत्रुन् जहि I
— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) May 12, 2025
Destroy the Enemy in the Sky.#PahalgamTerrorAttack #OperationSindoor#JusticeServed #IndianArmy@IAF_MCC @indiannavy pic.twitter.com/vO28RS0IdE
























