श्रीनगर : अमरनाथ यात्रेच्या मार्गादरम्यान काल (02 ऑगस्ट) पाकिस्तानी लष्कराची स्नायपर सापडल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंर भारतीय लष्कराने आज सीमेवर सर्च ऑपरेशन राबवले. या ऑपरेशनदरम्यान भारतीय जवानांनी सीमेवर 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.


जम्मू काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने धडक कारवाई करत पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमचा घुसखोरीचा डाव हाणून पाडला आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार 7 दहशतवादी ठार झाले आहेत. परंतु या कारवाईत आणखी दहशतवादी ठार झाले असल्याची शक्यता आहे.

गेल्या 36 तासांपासून भारतीय लष्कर आणि घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानी सैनिकांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

केरन सेक्टरमध्ये जोरदार चकमकी सुरु असल्यामुळे लष्कराला दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेता आले नाहीत, तसेच त्या मृतदेहांची ओळख पटवता आली नाही. त्यामुळे लष्कराने उपग्रहाद्वारे घेतलेली छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. दरम्यान हे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानचे सैनिक प्रयत्न करत आहेत.