Indian Army Helicopter Crashed: अरुणाचल प्रदेशमध्ये लष्कराचं चित्ता हेलिकॉप्टर (Cheetah Helicopter Crashed) कोसळलं आहे. हेलिकॉप्टरमधील दोन्ही लष्करी पायलट बेपत्ता आहेत. घटनास्थळी सर्च ऑपरेशन सुरु आहे. आज सकाळी बोमडिलाजवळ ही घटना घडली आहे. अद्याप अपघाताचे नेमकं कारण समजले नाही.
लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरने मिसामारीच्या दिशेने निघाले होते. अपघात झाला त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये पायलट आणि को-पायलट होते. गुवाहाटीचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत (Lt. Col. Mahendra Rawat) यांनी सांगितले की, ऑपरेशन सॉर्टीसाठी चित्ता हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. सकाळी 9.15 च्या सुमारास एअर ट्रॅफिक कंट्रोलशी (एटीसी) संपर्क तुटला.
ऑक्टोबर महिन्यात देखील झाला होता अपघात
ऑक्टोबर महिन्यात अरुणाचल प्रदेशमधील तवांग जवळ भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टर 'चित्ता'चा अपघात झाला होता. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला होता. तवांग जिल्ह्यातील जेमीथांग सर्कलच्या बाप टेंग कांग धबधब्याजवळील न्यामजांग चू या ठिकाणी अपघात झाला होता. चित्ता हेलिकॉप्टर सुरवा सांबा भागातून टेहळणीसाठी या भागात येत होते. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट होते. त्यातील एका पायलटचा मृत्यू झाला होता.
भारताबाहेर परदेशातही चित्ता हेलिकॉप्टरचा वापर
'चित्ता' हेलिकॉप्टर भारतीय लष्कराच्या ताफ्यात 1976 मध्ये दाखल झाले होते. हे 'चित्ता' हेलिकॉप्टर प्रवास, निरीक्षण, पाळत ठेवणे, लॉजिस्टिक, मदत आणि बचाव कार्यासाठी होतो. उंचावरील मोहिमेसाठी हे 'चित्ता' हेलिकॉप्टर उपयोगी आहे. चित्ता हेलिकॉप्टरमध्ये Artouste - III B turbo shaft इंजिन आहे. हिंदुस्तान एअरोनॉक्स लिमिटेडने (Hindustan Aeronautics Limited) याची निर्मिती केली आहे. HAL ने जवळपास 250 हून चित्ता हेलिकॉप्टरची निर्मिती आणि विक्री केली आहे. भारताबाहेर परदेशातही या हेलिकॉप्टरचा वापर होतो. या विमानात दोन पायलट आणि तीन प्रवासी बसू शकतात.
पाच वर्षात 15 हेलिकॉप्टर क्रॅश
गेल्या पाच वर्षात 15 हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ही माहिती 17 डिसेंबरला लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्य संरक्षणमंत्री अजय भट्ट यांनी दिली, 2017 ते 2021 या कालावधीत तब्बल 15 दुर्घटना झाल्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :