Pharmacy Practice Regulation : फार्मसी प्रॅक्टिस रेग्युलेशन 2015 या कायद्याला बिहार (Bihar) राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे बिहारमध्ये आता फार्मासिस्टही रुग्णांना औषधं सांगून त्याबदल्यात फी आकारु शकतात. बिहारमध्ये फार्मसी प्रॅक्टिस रेग्युलेशन लागू करण्यात आलं आहे. हा कायदा लागू करणारं बिहार हे चौथं राज्य ठरलं आहे. या कायद्यानुसार, फार्मासिस्टला रुग्णांना गोळ्या आणि त्याबाबतच्या सूचना देण्यासाठी शुल्क आकारण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. त्यामुळे, आता फार्मासिस्ट देखील औषधे लिहून देऊ शकतील आणि त्यांचे दवाखाने उघडू शकतील असा अनेकांना वाटत आहे. मात्र, हे चूकीचं आहे. मग फार्मसी प्रॅक्टिस रेग्युलेशन 2015 हा कायदा नक्की आहे तरी काय जाणून घ्या.


फार्मसी प्रॅक्टिस रेग्युलेशन 2015 हा कायदा लागू करणारं बिहार हे चौथं राज्य आहे. या आधी केरळ, कर्नाटक आणि दिल्लीमध्ये हा कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याचा उद्देश फार्मासिस्ट प्रॅक्टिस सेक्टरमध्ये सुधारणा आणि नियमन करणं हे होतं. हा कायदा फार्मसी काऊन्सिल ऑफ इंडियानं तयार केला आहे.


काय आहे फार्मसी प्रॅक्टिस रेग्युलेशन 2015 कायदा? त्याचे फायदे काय हे सविस्तर वाचा.


सोप्या भाषेत याचा अर्थ म्हणजे या कायद्यानुसार औषध दुकानातील फार्मासिस्टबाबत नियम आणि फार्मासिस्टची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. 2021 मध्ये या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. फार्मसी प्रॅक्टिस रेग्युलेशन 2015 हा कायदा 16 जानेवारी 2015 पासून संविधानात समाविष्ट करण्यात आला आहे. मात्र, सर्व राज्य सरकारकडून याबाबतची परवानगी नाही.


यामध्ये फार्मासिस्टच्या प्रॅक्टिसचे नियम, फार्मासिस्ट होण्याचे नियम, फार्मासिस्टच्या जबाबदाऱ्या इत्यादी गोष्टी समजावून सांगण्यात आल्या आहेत. या कायद्यात फार्मासिस्टला रुग्णांना सूचना देण्यासाठी शुल्क आकारण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. पण, याचा अर्थ नाही की आता फार्मासिस्ट देखील औषधे लिहून देऊ शकतील आणि त्यांचे दवाखाने उघडू शकतील. या कायद्यानुसार फार्मासिस्टला दवाखाना उघडण्याची परवानगी नाही. या कायद्यानुसार, फार्मासिस्ट रुग्णाला औषधं सुचवू शकतात आणि त्याचं शुल्क आकारू शकता. 


फार्मासिस्ट औषधं लिहून देऊ शकतील?


हा कायदा आल्यावर आता फार्मासिस्टही डॉक्टरांप्रमाणे दवाखाने उघडू शकतील आणि त्यासोबत प्रिस्क्रिप्शनही लिहू शकतील, असे लोक गृहीत धरत आहेत. पण तसं नाही. याबाबत सरकारकडून स्पष्टीकरणही आलं आहे, ज्यामध्ये फार्मसी प्रॅक्टिस रेग्युलेशन नियमात क्लिनिक सुरु करण्याबाबत कोणतीही तरतूद नाही. म्हणजे फार्मासिस्टला दवाखाना उघडता येणार नाही.


फार्मासिस्ट काय करू शकणार?


या कायद्यानुसार आता कोणताही फार्मासिस्ट औषधाचं नाव आणि त्याची माहिती देऊ शकतात. यासोबतच फार्मासिस्ट औषधाचे प्रमाण, औषध घेण्याची पद्धत, औषध घेता येत नसेल तर काय करावं याबाबतच्या सूचना ग्राहकांना देऊ शकतात. दरम्यान, याचा अर्थ असा नाही की फार्मासिस्ट डॉक्टरांप्रमाणे रुग्णांना औषधं प्रिस्क्राईब करतील. फार्मासिस्टना प्रिस्क्रिप्शन देता किंवा दवाखाना उघडता येणार नाही.