Satara News : सातारा जिल्ह्यातील (Satara News) जावळी तालुक्यातील बामनोलीमधील प्रथमेश पवार यांनी लष्करात भरती झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र तब्बल 10 महिन्यांच्या कालावधीनंतर जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी या प्रकरणाचा उलघडा करून प्रकरणाला वाचा फोडली आहे. प्रथमेश पवार यांनी आत्महत्या नव्हे, तर त्यांची त्यांच्याच आर्मी कॅम्पमधील जवानाने एके-47 मधून गोळी झाडून हत्या केल्याचे सिद्ध झाले आहे. आपला मुलगा आत्महत्या करूच शकत नाही, अशी प्रतिक्रिया प्रथमेश पवार यांनी त्यावेळी देत प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. यानंतर या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून प्रथमेश पवार यांच्या वडिलांना भारतीय लष्करापासून ते पंतप्रधान, राष्ट्रपतींपर्यंत पाठपुरावा केला होता. त्यामुळे या प्रकरणाला तब्बल 10 महिन्यांनी वाचा फुटली आहे. 


नेमका प्रकार काय घडला?


जावळी तालुक्यातील बामनोली उर्फ कुडाळ गावचे सुपुत्र जवान प्रथमेश पवार यांनी जम्मू काश्मीरमधील सांबा कॅम्पमध्ये आत्महत्या केल्याचे भारतीय सैन्य दलाकडून जाहीर करण्यात आले होते. तथापि, प्रथमेश पवार यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सांबा कॅम्पमध्ये असणाऱ्या जवान वैद्य खुशरंगला जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एके-47 रायफल जप्त करण्यात आली आहे.


प्रकरण दडपण्याचा प्रयत्न? 


दरम्यान गेल्या वर्षभरापासून या प्रकरणाचा प्रथमेश पवार यांचे वडील संजय पवार यांच्याकडून सुरु होता. प्रथमेश 2022 मध्ये भारतीय सैन्य दलात जवान म्हणून दाखल झाले होते. ट्रेनिंगनंतर त्यांची पहिली पोस्टिंग जम्मू-काश्मीरमधील सांभा सेक्टरमध्ये झाली होती. यानंतर मिलिटरी कॅम्पमध्येच गोळी मारून प्रथमेश पवार यांनी आत्महत्या केल्याचा निरोप जम्मू-काश्मीरमधून बामनोलीमधील पवार कुटुंबीयांना मिळाला होता. मात्र, आपला मुलगा आत्महत्या करू शकत नसल्याचं पवार कुटुंबियांचा विश्वास होता. ही आत्महत्या नसून घातपात असल्याचे शंकाही त्यांनी व्यक्त केली होती. 


पार्थिव स्वीकारण्यास कुटुंबीय तयार नव्हते. या घटनेचा तपास करण्याची मागणी त्यांनी केली होती. मुलाच्या निधनानंतर वडील संजय महादेव पवार स्वतः जम्मूला गेले होते. त्यांनी लिखित स्वरूपात तक्रार दाखल करून मुलाच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला होता. मात्र, सैन्य दलातील अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती पवारांना मिळाली नव्हती. त्यामुळे पवार यांनी पंतप्रधान, संरक्षण मंत्री, केंद्रीय गृहमंत्री व भारतीय सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्र लिहिले होते. 


जम्मू पोलिसांकडून तपास 


त्यामुळे संबंधित प्रकरणाचा तपास गृह विभागाने जम्मू-काश्मीर पोलीस दलाकडे सोपवला होता. तब्बल दहा महिन्यांच्या तपासानंतर प्रथमेश पवार यांच्या संशयास्पद मृत्यूचा उलघडा करण्यात पोलिसांना यश आले.  प्रथमेश ड्युटीवर असताना वैद्य खुशरंग या सैनिकाने प्रथमेश पवार यांच्यावर गोळी झाडून हत्या केल्याचे उघड झाले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी संशयित वैद्य खुशरंगला अटक केली आहे. त्यामुळे प्रथमेश पवार यांच्या वडिलांनी दिलेल्या लढ्याला तब्बल एक वर्षांनी यश आलं आहे.


इतर महत्वाच्या बातम्या