Weather Update In India : देशातील अनेक भागात कडाक्याची थंडी (Cold Weather) पडली आहे. थंडी आणि धुक्यामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेष उत्तर भारतात थंडीचा जोर अधिक वाढला आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (kanpur) थंडीमुळं हृदयविकाराचा झटका आल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढत असल्याचं चित्र दिसत आहे.
उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये रात्री आणि सकाळी थंडी आणि दाट धुके पडत आहे. थंडीच्या लाटेचा मानवी जीवनावर परिणाम होत असल्याचं दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये थंडीचा जोर इतका वाढला आहे की, थंडीमुळं हृदयविकाराच्या धक्क्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळं लोकांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे. पुढील तीन दिवसांत उत्तराखंड, राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम आणि त्रिपुरामध्ये दाट धुके पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
'या' भागात थंडीचा लाट राहणार
आज राजस्थान, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागंन वर्तवली आहे. याशिवाय उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागात आणि पंजाब, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड आणि ओडिशाच्या विविध भागात पुढील दोन ते तीन दिवस थंडीची लाट राहील. 9 जानेवारीला म्हणजे उद्या राजस्थान, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीत थंडीची लाट राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
देशाची राजधानी गारठली
देशाची राजधानी दिल्ली आज चांगलीच गारठली आहे. आज (8 जानेवारी) दिल्लीत थंडीची लाट आणि धुक्याची चादर पसरली आहे. हवामान विभागानं आज दिल्लीत थंडीच्या लाटेचा 'ऑरेंज अलर्ट' आणि धुक्याचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. किमान तापमान 3 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. तर कमाल तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. धुक्यामुळे पालम आणि सफदरजंगसह अनेक भागात दृश्यमानता 50 मीटरपेक्षा कमी राहिली आहे. सध्या देशातील अनेक भागात डोंगरापासून मैदानी प्रदेशापर्यंत कडाक्याची थंडी जाणवत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. अनेक भागात दाट धुके पडले आहे. मध्य प्रदेशातील अनेक भागांमध्ये किमान तापमान 2 ते 6 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. पंजाबच्या अनेक भागात दाट धुके कायम राहण्याचा अंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या: