PIL On Joshimath Land Sinking: हिमालयाच्या कुशीत वसलेलं, बद्रीनाथच्या वाटेवर असलेलं जोशीमठ सध्या एका भयानक संकटाला तोंड देतंय. हे शहर जणू जमिनीत खचत चाललंय. एकाचवेळी शहरातल्या पाचशेहून अधिक घरांना मोठे तडे गेलेत.. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलेय. सोमवारी याच्यावर सुनावणी होणार आहे. ज्योतिष्पीठमधील जगद्गुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी आज शनिवार (07 जानेवारी) या प्रकरणी आपल्या वकिलाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी सुनावणी होणार आहे.
जोशीमठ..बद्रीनाथसाठीचं प्रवेशद्वार..भारत चीन सीमेवरचा लष्कराचा मोक्याचा तळ...पण हिमालयाच्या कुशीतलं हे गाव सध्या वेगळ्या कारणांनी हेडलाईन्समध्ये आहे...एकदोन नव्हे तर इथल्या 500 घरांना असे तडे गेलेत...या भेगा पण साध्या नाहीयत...सगळ्या शहरावर अशा वीतभर भेगा पडत जमीन फाटलीय..लोक भयभीत झालेत, रात्री मशाल मोर्चे काढतायत...घरापेक्षा रस्त्यावरच त्यांना तुलनेनं सुरक्षित वाटतंय..कशामुळे आलीय ही वेळ?
खरंतर जोशीमठमधल्या या संकटाची पहिली चाहूल 1976 मध्येच दिली गेली होती. रस्ते, जलविद्युत प्रकल्प आणि शहर विकासाच्या नावाखाली अति केलंत तर जोशीमठमध्ये अशी स्थिती उद्भवू शकते याचा इशारा मिश्रा समितीच्या रिपोर्टमध्ये देण्यात आला होता.
हिमालयातलं हे अख्खं शहर खचत का चाललंय?
उत्तराखंडमधल्या चमौली जिल्ह्यात 6150 फूट उंचीवर जोशीमठ वसलं आहे
हिंदूंसाठी पवित्र चारधामपैकी एक धाम बद्रीनाथसाठीचं हे प्रवेशद्वार
20 हजार लोकवस्तीच्या या गावात 500 घरांना अशा मोठ्या भेगा पडल्यात
हिमालयाच्या दरडी कोसळणारी ही जागा, त्याच जागेवर काही वर्षांपूर्वी हे शहर वसलं
गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या परिसरात जलविद्युत प्रकल्प, रस्ते रुंदीकरण आणि इतर बांधकामं वाढली
चारधामसाठी हायवे रुंदीकरणाचं काम इथं सुरु आहे, जे सध्या स्थानिकांच्या विरोधामुळे थांबवलं गेलं
जोशीमठमध्ये 4 जानेवारीपासूनच परिस्थिती गंभीर बनत गेली. लोक रात्रीचे मशाल मोर्चे काढतायत..हायवेची कामं बंद पाडतायत..एनटीपीसी जे इथल्या जलविद्युत प्रकल्पांची कामं करतंय. त्यांच्या कार्यालयावर निदर्शनं करतायत. काल राज्य आणि केंद्र सरकारनंही याबाबत हालचाली सुरु केल्या..संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकांना स्थलांतरित करण्याची मोहीम सुरु झालीय...लष्कराचे चॉपर्स त्यासाठी तैनात ठेवले गेलेत.या संपूर्ण स्थितीबाबत काय करता येईल यासाठी केंद्र सरकारनंही तातडीनं समितीची घोषणा केलीय. पण यात सगळे सरकारीच लोक आहेत. अशा संकटात सरकारी धोरणांचं कडक परीक्षण व्हायचं असेल तर एखाद्या खासगी तज्ज्ञांनाही घ्यायला हवं होतं अशीही टीका होतेय. जोशीमठमधल्या या भेगा काही अचानक आलेल्या नाहीयत. याआधी निसर्गानं दिलेल्या अनेक इशाऱ्यांकडे केलेलं हे दुर्लक्ष आहे. 2021 मध्येही काही ठिकाणी भेगा पडल्याची उदाहरणं होती. त्यामुळे आता या संकटातून तरी काही ठोस धडा आपण घेतो का हे पाहावं लागेल.