Weather Update Today: देशभरात पावसाने (Rain) पुन्हा एकदा हजेरी लावल्याने वातावरण अल्हाददायक झालं असून, वाढलेल्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या देशातील बहुतांश राज्यांत पाऊस सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने अनेक शहरांत पुन्हा एकदा दमदार बॅटिंग सुरू केली आहे. नवी दिल्लीत शनिवारी आणि रविवारी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे दिल्लीतील तापमानात आज घट पाहायला मिळेल.


जवळपास देशभरात आज मुसळधार पाऊस


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (9 सप्टेंबर) पश्चिम मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातसह 19 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्येही आज, म्हणजेच शनिवारीही पावसाची शक्यता आहे.


राजधानी दिल्लीत कसं असेल हवामान?


हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 9 आणि 10 सप्टेंबर रोजी G20 परिषदेदरम्यान दिल्लीत पाऊस पडण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर, G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने दिल्लीतील हवामानाची माहिती देण्यासाठी त्यांच्या वेबसाईटवर स्पेशल पेज तयार केलं आहे, ज्यावर नियमितपणे विशेष बुलेटिन जारी केलं जाणार आहे. राजधानीत आज कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.


महाराष्ट्रात दिवसभर राहणार पाऊस


राज्यात पुढचे 2 दिवस पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र तसंच विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे. पुण्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.


मुंबईत ऑरेंज अलर्ट


हवामान विभागाने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून दुपारी 1 वाजेपर्यंत मुंबईत ऑरेंज अलर्ट असणार आहे. या काळात मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति-मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. महिन्याभराच्या विश्रांतीनंतर राज्याच्या अनेक भागात हवामान विभागाने जोरदार कमबॅक केल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. 


उत्तर प्रदेशमध्येही पडणार मुसळधार पाऊस


हवामान खात्याने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेशच्या हवामानाबाबत बोलायचं झालं तर, गेल्या दोन दिवसांपासून यूपीतील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या अलर्टनुसार, उत्तर प्रदेशमध्ये जोरदार पाऊस बरसत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील  24 जिल्ह्यांमध्ये हवामानात बदल दिसून येईल.


राजस्थानमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज


राजस्थानमध्ये कडक उष्णतेनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राजस्थानच्या विविध जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली. आजही राजस्थानमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.


उत्तराखंडमध्ये पावसाचा यलो अलर्ट


उत्तराखंडमध्ये देखील आज पावसाचा अंदाज आहे. डेहराडून, बागेश्वर, पिथौरागढ आणि नैनिताल जिल्ह्यांत हवामान खात्याने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. उत्तराखंडमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. टिहरी, पौरी आणि हरिद्वार जिल्ह्यांतील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Agriculture News : सोयाबीनच्या अग्रीम पीक विम्याचा प्रश्न मार्गी, बीड जिल्ह्यातील सर्व 86 मंडळांना 25 टक्के पीक विमा लागू