India Weather : देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत उत्तर भारतात जोरदार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार दिवस देशात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये पूर्व भारतातील राज्यांसह उत्तर आणि पश्चिम भारताच्या काही भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.


या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता


देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील पाच दिवसांत कोकण, गोवा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्याचबरोबर गुजरात, तेलंगणा आणि ओडिशामध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, उत्तराखडं, पंजाब हरियाणासह उत्तर प्रदेशमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 


छत्तीसगडमध्ये मुसळधार पाऊस


छत्तीसगडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं राज्यातील नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दुर्ग जिल्ह्यातून वाहणारी शिवनाथ नदी सध्या दुथडी भरुन वाहत आहे. गेल्या चार दिवसांपासून दुर्ग विभागात पाऊस पडत आहे. त्यामुळं शिवनाथ नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. छत्तीसगडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीबाबत हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. राजनांदगाव जिल्ह्यातील मोगरा जलाशयातून सातत्याने पाणी सोडल्याने शिवनाथ नदीच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ झाली आहे.


दिल्लीत पूरसदृश परिस्थितीनंतर जनजीवन पूर्वपदावर 


दिल्लीतील पूरसदृश परिस्थितीनंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत  आहे. काही भागात अद्याप पाण्याच्या पातळीत चढ-उतार होत असल्यामुळं लोक अजूनही मदत छावण्यांमध्ये आसरा घेत आहेत. दिल्ली सरकारचा गलथान कारभार असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. पूरग्रस्तांसाठी असलेल्या मदत शिबिरांमध्ये पुरेशा सुविधा उपलब्ध  केल्या नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसचे माजी आमदार अनिल भारद्वाज यांनी पूरग्रस्तांसाठी उभारलेल्या मदत शिबिराची पाहणी केली. यादरम्यान छावणीतील परिस्थिती पाहून काँग्रेस नेत्याने दिल्ली सरकारवर जोरदार निशाणा साधला.


महाराष्ट्रातही जोरदार पाऊस


राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसानं (Heavy rain) हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जणजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील काही भाग वगळता बहुतांश जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. सध्या मुंबईसह उपनगर ठाणे, पालघर जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain: पालघर, ठाणे, रायगड, रत्नगिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा आज बंद; मुसळधार पावसाची शक्यता