NCP crisis In Maharashtra : नागालँडमधील सातही आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रानंतर नागालँडमध्येही शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. नागालँड मध्ये राष्ट्रवादीने आधीच सत्ताधारी एन पी पी- भाजपच्या युतीला पाठिंबा जाहीर केला होता. पक्षासाठी लढाई सुरू होईल तेव्हा विधिमंडळ पक्षात बहुमत दाखवण्यासाठी अजित पवार गटाला फायदा होईल.
अजित पवार यांनी काही आमदारांना हाताशी धरत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या या निर्णायानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार यांच्यामध्ये राष्ट्रवादीचा पक्ष विभागाला गेला. आमदार आणि खासदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला. महाराष्ट्रातील दहा ते १५ आमदारांचा शरद पवार यांना पाठिंबा आहे. अजित पवार यांनी जवळपास ४० नेत्यांना साथीला घेत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रस पक्ष विभागाला गेला. काही जणांची शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला तर काहीजण अजित पवारांच्या गटात सहभागी झाले.
अजित पवार आणि समर्थक आमदारांना आम्हीच खरी राष्ट्रावादी म्हणत पक्षावर आणि चिन्हावर दावा केला आहे. हा वाद निवडणूक आयोगात जाऊ शकतो. त्यावेळी विधिमंडळ पक्ष कुणाचा, याबाबत चर्चा करताना अजित पवार यांच्याकडे असणारे संख्याबळ जास्त दिसत आहे. त्यातच आता मणिपूरमधील आमदारांनीही अजित पवार यांच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला. आज या आमदारांनी प्रफुल्ल पटेल यांची भेट घेत अजित पवारांना पाठिंबा असल्याचे सांगितले. मणिपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार आहेत.. मणिपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप सत्तेवर आहेत.
दोन जुलै रोजी अजित पवार यांनी उप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गेल्या काही दिवसांमध्ये या सगळ्या घडामोडी घडल्या आणि राष्ट्रवादीत शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. मणिपूरमधील आमदारांनी अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. नागालँडचे प्रदेशाध्यक्ष वानथुंग यांनी दिल्लीत येऊन प्रफुल्ल पटेल यांची आणि महाराष्ट्रात येऊन सुनील तटकरेंची भेट घेतली. त्यानंतर या निर्णयाची माहिती देण्यात आली.