नवी दिल्ली : इंडिया आणि भारत ही दोन नावं देशाला असली तरी त्या दोन्हीमध्ये एक प्रतिकात्मक भेद आहे. इंडिया हे नाव इंग्रजी..चकचकीत भारताचं प्रतिनिधीत्व मानलं जाते.  तर भारत हे नाव येथील ग्रामीण संस्कृतीचं.. पण आता लवकरच  देशाच्या नावात काही बदल होणार का याची चर्चा सुरु झाली आहे. कारण आज राष्ट्रपती भवनाकडून प्रथमच एक मोठा बदल केला गेला. 


देशाचं नाव आता इंडिया ऐवजी भारत होणार का?


आज सकाळी देशाच्या राष्ट्रपतींनी त्यांच्या अधिकृत राजपत्रावर प्रथमच प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख केला.  त्यावरुन प्रतिक्रियांची एकच रांग लागली. जी 20 बैठकीसाठी 9 सप्टेंबरला जे सरकारी भोजन होणार आहे, त्याच्या आमंत्रणावर राष्ट्रपती भवनाकडून हा उल्लेख झाला. त्यानंतर हा देशाच्या नामांतराचा घाट आहे का अशी पहिली शंका  काँग्रेसने घेतली . खरंतर देशाच्या घटनेच्या पहिल्या कलमात, ज्या वाक्यानं घटनेची सुरुवात होते, त्यात India that is Bharat..shall be union of states. असं वाक्य आहे. म्हणजे इंडिया आणि भारत अशी दोन्ही नावं घटनेनंच मान्य केलेली आहेत. पण इंडियाऐवजी भारत असा उल्लेख व्हावा ही संघाची जुनी मागणी आहे. हा बदल आता लवकरच होतो का याची चर्चा आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या एका ट्विटमुळेही झाली. 


घटनेत इंडिया आणि भारत अशी दोन्ही नावं असतील तर दोन्हीपैकी कुठलंही नाव सरकार, राष्ट्रपती वापरू शकतात. हा केवळ इंडिया ऐवजी भारत या शब्दाला प्राथमिकता देण्याचा प्रयत्न आहे की इंडिया हे नावच हटवायचं आहे हे अजून स्पष्ट नाही. पण इंडिया हा शब्द घटनेतून वगळायचाच असेल तर त्यासाठी घटनादुरुस्ती मात्र करावी लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही इंडिया ऐवजी भारत असं म्हणण्याचा आग्रह जाहीरपणे धरलेला होता.


इंडिया ऐवजी भारत हा बदल ज्या वेळेला होतोय ते टायमिंगही इंटरेस्टिंग आहे. विरोधकांनी बंगळुरुमधल्या दुसऱ्या बैठकीत आपल्या आघाडीचं नाव इंडिया निश्चित केलं.  पण या नावाचा उल्लेख न करता घमंडिया आघाडी असाच उल्लेख मोदी करत राहिले. विरोधकांनी त्यांच्या घोषणेत जुडेगा भारत, जीतेगा इंडिया...असे दोन्ही शब्द आणलेत. अजून इंडिया नावाचं काय होणार हे स्पष्ट नाही. पण जर बदल झालाच तर तो किती भारी असेल हे सेलिब्रेटींच्या ट्विटमधून दिसायलाही लागलं. 


भारत किंवा भारतवर्ष हे नाव पौराणिक साहित्यातून आलं आहे. महाभारत या ग्रंथाच्या नावातही भारत आहेच. दुसरीकडे जितकं पौराणिक तितकंच ते आधुनिक इतिहासाशीही जोडलं गेलंय. भारत माता की जय ही घोषणा स्वातंत्र्यलढ्याची घोषणा बनली होती. इंडिया हे नाव ब्रिटीशांनी दिलं होतं. भारत, हिंदुस्थान, इंडिया अशा तीन नावं संविधान सभेसमोर होती. त्यात हिंदुस्थान हे नाव मागं पडलं आणि ही दोन्ही नावं मात्र कायम ठेवली गेली. इतके दिवस शहरांची नावं बदलली जात होती, आता थेट देशाचंच नाव बदललं जातं का हेही पाहावं लागेल. संसदेच्या विशेष अधिवेशनात काय होणार यासाठी आधी वन नेशन वन इलेक्शनची चर्चा होती, आता आजपासून नामबदलाची चर्चा सुरु झालीय. पण नेमकं काय होतं याची उत्सुकता आहे. 


हे ही वाचा :


President Of Bharat : 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' ऐवजी भारत लिहिल्याने नवा वाद, विरोधक आणि भाजप आमनेसामने