नवी दिल्ली : दिल्लीच्या साकेत कौटुंबिक न्यायालयाने (Saket Family Court) एका याचिकेवर सुनावणी करताना आईला अल्पवयीन मुलाच्या पालनपोषणासाठी (Maintenance) दरमहा 60 हजार रुपये भरण्याची नोटीस बजावली आहे. 14 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या वतीने दिल्लीच्या साकेत कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल करुन आपल्या आईकडे पालनपोषणासाठी पैशांची मागणी करण्यात आली होती. कौटुंबिक न्यायालयाने जारी केलेल्या नोटीसनुसार, या याचिकेद्वारे मुलाने आईकडून प्रति महिना 60 हजार रुपये देण्याची मागणी केलीहोती. या याचिकेची दखल घेत साकेत कोर्टाने आईला नोटीस जारी केली आहे. साकेत कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश प्रीतम सिंह यांच्या खंडपीठाने शनिवारी (2 सप्टेंबर) या प्रकरणाची सुनावणी करताना आईला नोटीस बजावून तिच्या मुलाच्या पालनपोषणासाठी दरमहा ही रक्कम भरण्यास सांगितलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 डिसेंबर 2023 रोजी ठेवण्यात आली आहे.


संबंधित अल्पवयीन मुलगा हा आपल्या वडिलांसोबत राहतो. त्याचे वडील पेशाने वकील आहेत. तर त्याची आई दिल्लीतील एम्समध्ये सीनियर नर्स आहे. दरमहा दोन लाख रुपये कमावत असतानाही आई मुलाच्या पालनपोषणासाठी सहकार्य करत नाही, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.


याचिकेत काय म्हटलं?


अल्पवयीन मुलाचे वडिलांनी वकील आबिद अहमद आणि मोबिना खान यांच्या वतीने आपल्या मुलासाठी याचिका दाखल केली आहे. यात म्हटलं आहे की, "अल्पवयीन मुलाचे वडील गेल्या 14 वर्षांपासून एकटेच मुलाचा सांभाळ करत आहेत." "आईने देखील मुलाच्या देखभालीचा खर्च उचलावा," अशी विनंती करण्यात आली आहे. संबंधित मुलगा हा 14 वर्षांचा असून तो एका खासगी शाळेत आठवी इयत्तेत शिकतो. मुलाचे वडील 11 हजार रुपये शाळेची फी म्हणून भरतात, सोबतच 40 हजार रुपये त्याच्या खाण्या-पिण्यावर, कपड्यांवर, शैक्षणिक साहित्यावर खर्च करतात. याशिवाय एक लाख रुपयांचा वार्षिक प्रीमियम देखील जमा करत आहेत. 


मुलगा 40 दिवसांता असताना रस्त्यावर फेकलं, याचिकेत वडिलांचा आरोप


या याचिकेत वडिलांनी आईवर मुलाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. मुलाचा जन्म डिसेंबर 2008 मध्ये झाला होता, तेव्हापासून तो वडिलांसोबत राहत आहे. तर आईने केवळ मुलाकडे दुर्लक्षच केलं नाही तर तो अवघ्या 40 दिवसांचा असताना त्याला भर रस्त्यावर फेकून दिल्याचाही आरोप तिच्यावर आहे. याचिकेत म्हटलं आहे की, "मुलाच्या जन्मानंतरच आईने त्याच्यासोबत कोणतेही संबंध ठेवले नाहीत. तिने त्याच्या पालनपोषणात कोणताही हातभार लावलेला नाही." शिवाय मुलगा आणि वृद्ध पालकांचा सांभाळ करण्यात वडिलांनी अनेक वर्षे घालवली आहेत. आता मुलाचे वडील मानसिकरित्या एवढे खचले आहेत की, ते काम करण्याच्या परिस्थितीत नाही, कारण मुलाच्या आईने वडिलांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा खोटा गुन्हा दाखल केला आहे, असं याचिकेत नमूद केलं आहे. 


या याचिकेवरील पुढील सुनावणी 9 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात आईने आधीच तीन हजारी कोर्टामध्ये हुंड्याचा खटला दाखल केला असून ते प्रकरण अद्याप प्रलंबित आहे.