नवी दिल्ली : उत्तराखंडमधील बद्रिनाथ धामचे दरवाजे दीर्घ कालावधीनंतर शुक्रवारी पहाटे उघडण्यात आले. याआधी मंदिराला फुलांनी सजवण्यात आलं होतं. लॉकडाऊनमुळे सध्या बद्रिनाथमध्ये भाविक उपस्थित नाहीत. अगदी कमी लोकांची उपस्थिती येथे पाहायला मिळाली. प्रथेप्रमाणे पूजाअर्चा करून शुक्रवारी पहाटे 4.30 वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळी बद्रिनाथ धामचे मुख्य पुजारी, धर्माधिकारी यांच्यासह मंदिराशी निगडीत 28 लोकांचा समावेश होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिर फुलांच्या माळांनी सजवण्यात आलं होतं. वेदपठण, मंत्रोच्चारांसह भगवान बद्रिच्या विशाल गाभाऱ्याचे दरवाजे उघडण्यात आले.


याआधी टिहरी दरबारात पार पडलेल्या मंत्रोच्चारानंतर 30 एप्रिल रोजी सकाळी साडेचार वाजता दरवाजे उघडण्यात येणार असल्याचं ठरविण्यात आलं होतं. परंतु, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बद्रीनाथ मंदिराच्या समितीने दरवाजे उघडण्याची तारिख पुढे ढकलली होती. त्यानंत 15 मे रोजी ब्रम्ह मुहूर्तावर दरवाजे उघडण्याचं ठरविण्यात आलं. यासाठी प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या होत्या.


पाहा व्हिडीओ : गणेशाच्या शाडूच्या मूर्ती घडवण्यासाठी माती कुठून आणायची? मूर्तिकांरांसमोर प्रश्न



दरम्यान, प्रशासनाकडून दरवाजे उघडण्याआधीच सर्व तयारी पूर्ण करण्यात आली होती. केदारनाथ धाम आणि बद्रीनाथ धान दोन्ही ठिकाणांवर जाणाऱ्या रस्त्यांवरील बर्फ हटवण्यात आला होता. यासाठी प्रशासनाने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मजुरांना रस्त्यावरील बर्फ हटवण्याच्या कामासाठी पाठवलं होतं. तसेच यावेळी सोशल डिस्टन्सिंगचं पालनही करण्यात आलं होतं.


सध्या देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या 78 हजार पार पोहोचली आहे. आतापर्यंत 2500 पेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 26 हजारांहून अधिक लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


संबंधित बातम्या : 


आषाढी यात्रेचे भवितव्य आज ठरणार, अजित पवार दुपारी बैठक घेणार


परप्रांतीय मजूर गावी गेल्यास औद्योगिक कार्यक्षेत्राला मोठा फटका


अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सलग तिसऱ्यांदा साधणार संवाद, तिसऱ्या टप्प्यातही महत्वाच्या घोषणांची शक्यता