कोची : संपूर्ण भारताला प्रतीक्षा असलेल्या मान्सूनचं आगमन केरळमध्ये 28 मेपर्यंत अपेक्षित आहे. काही अडचणींमुळं जास्तीत जास्त  2 दिवसांच्या अंतराने का होईना पण मान्सून केरळमध्ये येईल, असा अंदाज स्कायमेटनं व्यक्त केला आहे.  केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर भारतातील अन्य भागात देखील वेळेवर दाखल होईल, असं देखील या अंदाजात म्हटलं आहे.


1960-2019 मधील आकडेवारीच्या आधारे यावर्षी नैऋत्य मॉन्सूनच्या तारखांचं संशोधन करण्यात आले आहे. अंदमानच्या समुद्रात होणारं आगमन 20 मेच्या ऐवजी 02 दिवसांनी पुढं ढकललं आहे. ते आता 22 मे वर गेलं असल्याचं देखील स्कायमेटनं म्हटलं आहे. तथापि, केरळमध्ये 1 जूनच्या आधी मान्सूनची सुरुवात होईल हे मात्र कायम आहे. देशाच्या मध्यातील बर्‍याच भागांमध्ये येण्यासाठी तीन ते सात दिवसांचा उशीर होणार आहे तर  उत्तर-पश्चिम भारतामध्ये सुमारे आठवडाभर लांबणीवर पडू शकतो, असंही स्कायमेटनं म्हटलं आहे.

कशी केली जाते मान्सून येण्यासंदर्भात घोषणा

केरळमध्ये सुरू होणाऱ्या नैऋत्य मॉन्सूनची घोषणा जमीन आणि समुद्रातील काही विशिष्ट अटींची पूर्तता झाल्यावर केली जाते. यासाठी कोमोरिन प्रदेशाच्या सान्निध्यात हिंद महासागरावरील वेगाने जाणार्‍या लाँगवेव्ह रेडिएशन (ओएलआर) च्या परिमाणानुसार पश्चिम दिशेच्या वाऱ्याची दिशा, वेग आणि खोली हे निर्णायक घटक आहेत. यासाठी कर्नाटक आणि केरळमधील 14 स्थानकांवर सलग दोन दिवस पावसाची नोंद ही सर्वात महत्वाची आणि प्राथमिक गरज मानली जाते.

पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाने झोडपले; वीज पडून दोघांचा मृत्यू

दरम्यान काल राज्यात अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना घडल्या. यात नाशिक जिल्ह्यातील पुरणगाव येथे वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. नांदेडमध्ये देखील वीज पडून एकाचा मृत्यू तर तीन कामगार जखमी झाले. आजच्या पावसाने पुणे, नाशिक, कोल्हापूर, नांदेड, परभणी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये हजेरी लावली.