नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फ्रेन्सिगच्या माध्यमातून इंडिया टॉय फेअर या खेळण्याच्या मोठ्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. देशी खेळण्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेलं हे प्रदर्शन 4 दिवस चालणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन करताना म्हटलं आहे की, हे पहिलं खेळण्याचं प्रदर्शन केवळ एक व्यापारी किंवा आर्थिक कार्यक्रम नाही तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाची जुनी खेळ आणि उल्हासाची संस्कृती, परंपरा मजबूत करण्याचा एक महत्वाचा दुवा आहे.
मोदींनी देशातील खेळणी उत्पादकांना आवाहन करताना म्हटलं की, देशातल्या खेळणी उत्पादकांनी अशी खेळणी बनवावीत, की जी पर्यावरण आणि मानसशास्त्र या दोन्हींसाठी लाभदायक असतील. खेळणी बनवताना प्लास्टिकचा वापर कमीत कमी करावा आणि रिसायकल अर्थात पुनर्वापर करता येण्यासारख्या घटकांपासून खेळणी बनवावीत, असंही ते म्हणाले.
प्राचीन काळी जेव्हा जगभरातले प्रवासी भारतात येत, तेव्हा ते भारतीय खेळ आत्मसात करत आणि आपल्यासोबत घेऊनही जात. आज जो बुद्धिबळ जगभरात लोकप्रिय आहे, तो आधी चतुरंग किंवा चादुरंगा नावाच्या रूपाने भारतात खेळला जात होता. आधुनिक युगातला लुडो तेव्हा 'पच्चिसी'च्या रूपात खेळला जात होता. आपल्या धर्मग्रंथांतही छोट्या रामाच्या वेगवेगळ्या खेळांचं वर्णन आढळतं, असं मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले की, पुनर्वापर हा भारतीय जीवनशैलीचा पूर्वीपासूनच भाग आहे. तेच चित्र आपल्या खेळण्यांमध्येही दिसतं. बहुतांश भारतीय खेळणी नैसर्गिक आणि पर्यावरणाशी अनुकूल घटकांपासून तयार केली जातात. त्यात वापरले जाणारे रंगही नैसर्गिक आणि सुरक्षित असतात,' असं मोदी म्हणाले. मोदींनी सांगितलं की, भारतीय खेळ आणि खेळणी यांचं वैशिष्ट्य हे असतं, की त्यात ज्ञान, विज्ञान, मनोरंजन आणि मनोविज्ञान या सगळ्या बाबींचा समावेश असतो, असं मोदींनी सांगितलं.
ऑगस्ट 2020 च्या मन की बातमध्ये केला होता उल्लेख
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ऑगस्ट 2020 मध्ये झालेल्या मन की बात कार्यक्रमात खेळणी उद्योगाला बळकटी देण्याबाबत भाष्य केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, जागतिक स्तरावर खेळणी उद्योगाची उलाढाल सात लाख कोटींपेक्षाही जास्त आहे, हे जाणून आपल्या सर्वांना नवल वाटेल. या सात लाख कोटींमध्ये भारताचा हिस्सा अतिशय कमी आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. मुलांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या पैलूंवर खेळण्यांचा प्रभाव पडत असतो. याविषयी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निश्चित करतानाही खूप लक्ष देण्यात आले आहे. मी आपल्या स्टार्ट-अप मित्रांना, आपल्या नव उद्योजकांना सांगू इच्छितो की, ‘टीम अप फॉर टॉइज’-चला, सर्वजण मिळून खेळणी बनवूया! आता सर्वांसाठी ‘लोकल’-स्थानिक खेळण्यासाठी ‘व्होकल’ होण्याचा हा काळ आहे, असं पंतप्रधान म्हणाले होते.