नवी दिल्ली: कोरोनाच्या कठिण काळात शेतकरी बांधवांनी आपली क्षमता सिद्ध केली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज, 30 ऑगस्ट रोजी देखील ते 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला.


पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, शेतकरी बांधवांनी कोरोनाच्या या कठिण परिस्थितीमध्येही आपली क्षमता सिद्ध केली आहे. आपल्या देशामध्ये यंदा खरीपाच्या पेरण्यांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत 7% वाढ झाली आहे. यासाठी मी देशातल्या सर्व शेतकरी बांधवांचे अभिनंदन करतो, त्यांच्या परिश्रमाला वंदन करतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.


देशात प्रत्येक सणाला संयम आणि साधेपणाचे यंदा दर्शन
साधारणपणे या काळात सण-उत्सव येतात. ठिकठिकाणी मेळे भरतात, धार्मिक पूजा-पाठ केले जातात. कोरोनाच्या या संकटकाळामध्ये लोकांमध्ये उमंग आहे, उत्साहही आहे आणि त्याचबरोबर सगळीकडे दिसणा-या शिस्तीचाही आपल्या सर्वांच्या मनाला वेगळाच स्पर्श जाणवतोय. देशामध्ये होत असलेल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये संयम आणि साधेपणाचे यंदा दर्शन होत आहे, हे अभूतपूर्व आहे. अनेक ठिकाणी तर गणेशोत्सवही ऑनलाइन साजरा केला जात आहे, असं पंतप्रधान म्हणाले.


टीम अप फॉर टॉइज


ते म्हणाले की, जागतिक स्तरावर खेळणी उद्योगाची उलाढाल सात लाख कोटींपेक्षाही जास्त आहे, हे जाणून आपल्या सर्वांना नवल वाटेल. या सात लाख कोटींमध्ये भारताचा हिस्सा अतिशय कमी आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.  मुलांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या पैलूंवर खेळण्यांचा प्रभाव पडत असतो. याविषयी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निश्चित करतानाही खूप लक्ष देण्यात आले आहे. मी आपल्या स्टार्ट-अप मित्रांना, आपल्या नव उद्योजकांना सांगू इच्छितो की, ‘टीम अप फॉर टॉइज’-चला, सर्वजण मिळून खेळणी बनवूया! आता सर्वांसाठी ‘लोकल’-स्थानिक खेळण्यासाठी ‘व्होकल’ होण्याचा हा काळ आहे, असं पंतप्रधान म्हणाले.


पंतप्रधान म्हणाले की, अभियानामध्ये आभासी खेळ असो खेळण्यांचे क्षेत्र असो, सर्वांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे आणि ही एक संधीही आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये देशाला #AatmaNirbhar बनवायचे आहे. असहकार आंदोलनाच्या रूपातून ते बीजारोपण झाले होते, त्याला आता, #AatmaNirbharBharat च्या वटवृक्षामध्ये परिवर्तित करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असं पंतप्रधान म्हणाले.


एक अॅप आहे- ‘आस्क सरकार’ यामध्ये चॅट बोटच्या माध्यमातून तुम्ही संवाद साधू शकता आणि कोणत्याही सरकारी योजनेविषयी माहिती जाणून घेवू शकता, असंही पंतप्रधान यांनी सांगितलं.


संपूर्ण देशामध्ये सप्टेंबर महिना ‘पोषण माह’ म्हणून पाळण्यात येणार


संपूर्ण देशामध्ये सप्टेंबर महिना ‘पोषण माह’ म्हणून पाळण्यात येणार आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. ज्याप्रमाणे वर्गामध्ये एक मॉनिटर असतो, त्याप्रमाणे न्यूट्रिशन मॉनिटरही असावा, प्रगती पुस्तकाप्रमाणे ‘न्यूट्रिशन कार्ड’ही बनविण्यात यावे, अशा गोष्टींनाही प्रारंभ करण्यात येत आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. पोषण माह-न्यूट्रिशन मंथ या काळामध्ये माय गव्ह पोर्टलवर एक ‘फूड अँड न्यूट्रिशन क्विज’ आयोजित करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर एक मीम स्पर्धाही होणार आहे. आपण सर्वांनी यामध्ये भाग घ्यावा आणि इतरांना भाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. जर आपल्याला गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ यूनिटी’ स्मारकाला भेट देण्याची संधी मिळाली असेल तर तिथे एक अगदी वेगळे, अव्दितीय न्यूट्रिशन पार्क बनविण्यात आले आहे, ते पहा, असंही पंतप्रधान म्हणाले.

सध्या एक ‘‘भारतीय कृषी कोष’’ तयार करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणकोणती पिके, उत्पादित होतात, त्यांच्यामध्ये किती पोषण मूल्य आहे, याची संपूर्ण माहिती त्यामध्ये असणार आहे. हा आपल्या सर्वांसाठी अतिशय उपयोगी कोष ठरणार आहे, असं देखील पंतप्रधान मोदी म्हणाले.