नवी दिल्लीः भारत पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार भारत 1960 मध्ये झालेला सिंधू नदी करार तोडण्याच्या विचारात आहे. हा करार तोडल्यास पाकिस्तानचं वाळवंट होऊ शकतं.

सिंधू नदी पाकिस्तानच्या एका मोठ्या भागाची तहान भागवते. काश्मीरमधील उरी दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ही रणनिती आखली असल्याची सूत्रांची माहिती आहे.

काय आहे सिंधू नदी करार?

सिंधू नदी पाकिस्तानची लाईफलाईन समजली जाते. सिंधू नदी करारांतर्गत सतलज, व्यास, रावी, सिंधू, झेलम आणि चेनाब या नद्यांच्या पाणी वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

यामध्ये सतलज, व्यास आणि रावी नद्यांचं जास्तीत जास्त पाणी भारतासाठी ठेवण्यात आलं आहे. तर सिंधू, झेलम आणि चेलाम या नद्यांच्या पाण्याचा मोठा हिस्सा पाकिस्तानला देण्यात आला आहे.

... तर पाकिस्तानचं वाळवंट होईल

भारताने हा करार रद्द केल्यास हे पाकिस्तानच्या नापाक हरकतींचं भारताने दिलेलं उत्तर असेल, असं जाणकारांचं म्हणणं आहे. सिंधू, झेलम आणि चेनाब या नद्यांवर पाकिस्तानचे अनेक विद्युत निर्मिती प्रकल्प आहेत. ज्यातून पाकिस्तानला वीज मिळते. शिवाय या तिन्ही नद्यांवर पाकिस्तानातील सिंचन प्रकल्पही आधारीत आहेत. त्यामुळे भारताने हा करार तोडल्यास पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर मोठा दबाव येणार आहे.

भारताने या करारांतर्गत 1960 पासून पाकिस्तानची तहान भागवली आहे. मात्र पाकिस्तानने स्वतंत्र झाल्यापासून भारताविषयी तिरस्काराचीच भूमिका ठेवली आहे. त्यामुळे भारत या निर्णयाद्वारे पाकिस्तानला कठोर उत्तर देऊ शकणार आहे.