नवी दिल्ली: उरी हल्ल्यात मारले गेलेले दहशतवादी पाकिस्तानचेच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ कमालीचा व्हायरल झाला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून एका जवानाने पाकिस्तानला ललकारले होते. या जवानाचा एबीपी माझाने शोध घेतला असता तो हिमाचल प्रदेशचा असल्याचे समाेर आले. या जवानाचे नाव मनोज ठाकूर असून त्यांनी त्या कवितेची सत्य कथा सांगितली.

मनोज ठाकूर हिमाचल प्रदेशच्या सहव्या आयआरबी बटालियन रिकोंग पीईओमध्ये हेड कॉन्स्टेबल आहेत. सध्या ते किन्नौर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. उरी हल्ल्यानंतर त्यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्या व्हिडिओमध्ये सादर केलेली कविता त्यांची नसल्याचे त्यांनी प्रांजळपणे सांगितले. मात्र, ज्या पद्धतीत त्यांनी ही कविता सादर केली, त्यामुळे साऱ्या देशवासियांना स्फूरण चढले. मनोज ठाकूर हे देखील एक उत्तम कवी असून त्यांनीही अनेक कविता केल्या आहेत.

मनोज यांचा हा व्हिडिओ 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवसावेळी यूट्यूबवर पोस्ट करण्यात आला होता. मात्र, उरीमधील दहशतवादी हल्ल्यात 18 जवान शहीद झाल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.

ठाकूर यांना उरी हल्ल्यासंदर्भात विचारले असता, त्यांनी त्याच त्वेषाने पुन्हा पाकिस्तानवर हल्ला चढवला. उरी हल्ल्यात 18 जवानांच्या हौतात्म्याने व्यथित झालेल्या ठाकूर यांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले पाहिजे, जेणेकरुन पुन्हा असले भ्याड हल्ले करण्याची हिंमत होणार नाही, अशी भावना व्यक्त केली.

पाहा व्हिडिओ