नवी दिल्ली : जीएसटी आणि नोटाबंदीवरुन विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधण्याची एक संधी सोडली नसली तरी जागतिक बँकेने सरकारच्या या निर्णयांचं स्वागत केलं आहे. भारत पुढील 30 वर्षात उच्च-मध्यमवर्गीयांची अर्थव्यवस्था होईल, असा दावा जागतिक बँकेने केला आहे. म्हणजेच भारतातील गरीबी कमी होणार असल्याचा दावा जागतिक बँकेने केला आहे.


जीएसटी आणि इतर आर्थिक बदलांमुळे भारतीय अर्थव्यवस्था सुधारणार असल्याचं जागतिक बँकेने सांगितलं. भारतात प्रती व्यक्ती कमाई वाढून चार पट होणं ही असामान्य गोष्ट आहे, असं जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टालीना जॉर्जिवा यांनी म्हटलं आहे.

उद्योगांमध्ये अव्वल असणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. भारताने या यादीत 30 स्थानांनी झेप घेत टॉप 100 मध्ये प्रवेश मिळवला. जागतिक बँकेने ही रँकिंग नुकतीच जारी केली आहे. त्यानंतर जागतिक बँकेच्या सीईओंनी भारतातील आर्थिक निर्णयांचा पुन्हा एकदा उल्लेख केला आहे.

पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी उचललेल्या पावलांचं क्रिस्टालीना यांनी कौतुक केलं. जीएसटीने एकीकृत बाजारव्यवस्थेच्या माध्यमातून जलद विकासाची संधी उपलब्ध केली आहे. याचा परिणाम थेट परदेशी गुंतवणुकीवर (एफडीआय) दिसत आहे. एफडीआय 2013-14 मध्ये 36 अब्ज डॉलर होता, जो आता 60 अब्ज डॉलर झाला आहे, असंही त्या म्हणाल्या.

गरीबी हटवणं हा विषय आता इतिहासजमा होणार आहे. यासाठी 2026 चं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. मात्र मोदींनी 2022 चं लक्ष्य ठेवलं आहे. सरकारची आतापर्यंतची कामगिरी पाहता हे शक्य आहे, असंही जॉर्जिवा म्हणाल्या.