पाटना : बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील सृजन घोटाळ्याने राज्य सराकर चांगलेच गोत्यात आलं होतं. त्यातच आता शौचालय घोटाळ्यामुळे विरोधकांसह लालूप्रसाद यादवांनी नितीश कुमार सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. शौचालय घोटाळ्यावरुन लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमारांवर निशाणा साधताना आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे.


शौचालय घोटाळ्यावरुन लालू प्रसाद यादव यांनी एकामागोमाग एक ट्विट करुन नितीश कुमारांवर निशाणा साधला. चारा घोटाळ्याचा उल्लेख करुन लालू प्रसाद यादवांनी एक ट्वीट केलं आहे.


या ट्विटमध्ये लालू प्रसाद यादव यांनी म्हटलंय की, "तथाकथित चारा घोटाळ्यावरुन याच लोकांनी माझ्यावर टीका करताना म्हटलं होतं की, लालूंनी चारा खाल्ला!, आता शौचालय घोटाळ्यावर ते काय म्हणतील? नितीश कुमारांनी काय खाल्लं?"

दुसरीकडे लालू प्रासद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनीही शुक्रवारी नितीश कुमारांवर जोरदार हल्ला चढवला आहे. "नितीश कुमार तुम्हीच सांगा, अर्चना आणि उपासना कोण होत्या. ज्यांच्या नावावर तुम्ही रेल्वे मंत्री असताना ट्रेन सुरु केल्या."

दरम्यान, पाटनामध्ये शौचालय बांधण्याच्या नावावर एका स्वयंसेवी संस्थेने 13 कोटी रुपये हडपल्याचं नुकतच समोर आलं आहे. शौचालय बनवण्यासाठी मंजूर निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याऐवजी आरोग्य विभागाने तीन स्वयंसेवी संस्थाच्या खात्यात जमा केले. या प्रकरणी पटनामधील गांधी मैदान पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.