नवी दिल्ली : वास्तविक नियंत्रण रेषेवरून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लघन होत असल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानी उच्चायुक्तांना देत तीव्र नाराजी दर्शवली आहे. तसंच निशस्त्र आणि निरपराध लोकांना निशाणा बनवणं बंद करा, असा इशारा भारताने दिला आहे.


17 जुलैच्या रात्री पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लघन

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी 18 जुलै रोजी पाकिस्तान उच्चायुक्तांना नियंत्रण रेषेवरून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लघन होत असल्याची माहिती दिली होती. 17 जुलै ला रात्री पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लघन करत नियंत्रण रेषेवरून झालेल्या गोळीबारात एका लहान मुलासह तीन निरपराध नागरिकांचा यात मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील कृष्णाघाटी सेक्टरमध्ये झालेल्या या गोळीबारात मृत्यू सर्व नागरिक एकाच कुटुंबातील होते. या घटनेचा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तान उच्चायुक्तांसमोर  तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान सैन्याकडून भारतीय नागरिकांना लक्ष्य करुन जाणीवपूर्वक कारवाई केली जात असल्याचा आरोप करत तीव्र आक्षेप व्यक्त केला. त्याचबरोबर, परराष्ट्र मंत्रालयाने सीमेपलीकडे असलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून सातत्याने पाठबळ केले जात आहे. तसेच सीमेवर होणारा गोळीबार हा दहशतवाद्यांच्या घुसखोरीला मदत करण्यासाठी करण्यात येत असल्याचेही बोलून दाखवलं.

2020 मध्ये पाकिस्तानकडून आतापर्यंत 2711 पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचं उल्लघन

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार 2020 मध्ये पाकिस्तान सैन्याने आतापर्यंत 2711 पेक्षा अधिक शस्त्रसंधीचं उल्लघन केले असून त्यामध्ये 21 भारतीयांचा मृत्यू झाला असून 94 जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे 2003 पासून भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर शस्त्रसंधी लागू आहे. पण पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या गोळीबारामुळे या शस्त्रसंधीला तडा जात आहे.