National Smart City Award : केंद्र सरकारने भारतीय स्मार्ट शहरे पुरस्कार स्पर्धा (ISAC) 2022- विजेत्यांची घोषणा केली आहे. यामध्ये पुन्हा एकदा इंदूरने (Indore) बाजी मारत सर्वोत्कृष्ट 'नॅशनल स्मार्ट सिटी अवॉर्ड' (National Smart City Award) जिंकला आहे. इंदूरनंतर दुसरा क्रमांक सुरतला (Surat) तर तिसरा क्रमांक आग्रा (Agra) शहराला मिळाला आहे.  80 पात्रताधारक स्मार्ट शहरांमधून 845 नामांकने आली होती. त्यातील एकूण 66 अंतिम विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड आणि सोलापूर शहराचा समावेश आहे. 


भारतीय स्मार्ट शहरे पुरस्कार स्पर्धेच्या विजेत्या शहरांच्या नावाची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड शहराला प्रशासन श्रेणीत स्मार्ट सारथी अॅपसाठी सन्मानीत करण्यात येणार आहे. तर पश्चिम विभागातील विभागीय स्मार्ट शहराचा पुरस्कार सोलापूर शहराला जाहीर झाला आहे.  27 सप्टेंबर रोजी इंदूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातील. 


25 जून 2015 रोजी स्मार्ट शहर (सिटी) मिशनची सुरुवात


नागरिकांना, स्मार्ट उपाययोजनांच्या वापराद्वारे मूलभूत पायाभूत सुविधा, स्वच्छ आणि शाश्वत वातावरण सुखी जीवनमान प्रदान करणे या उद्देशाने 25 जून 2015 रोजी स्मार्ट शहर (सिटी) मिशनची सुरुवात झाली होती. देशातील शहरी भागात विकासात्मक आदर्श बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट  आहे. या अंतर्गत एकूण प्रस्तावित प्रकल्पांपैकी 1 लाख 10 हजार 635 कोटी रुपये किमतीचे 6 हजार 41 (76%) प्रकल्प पूर्ण झाले आहेत. 60 हजार 95 कोटी रुपये किमतीचे उर्वरित 1 हजार 894 प्रकल्प 30 जून 2024 पर्यंत पूर्ण होतील.


सर्वोत्कृष्ट राज्यांच्या कामगिरीत मध्य प्रदेशने प्रथम कर्माक पाटकावला आहे. तर तामिळनाडूने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तर राजस्थान आणि उत्तर प्रदेश यांनी संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकावला आहे. चंदीगडला केंद्रशासित प्रदेशांच्या श्रेणीत प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. चंदीगडने त्याच्या ई-गव्हर्नन्स सेवांसाठी सर्वोत्कृष्ट प्रशासन श्रेणीमध्ये देखील विजेतेपद पटकावले आहे. निवडलेल्या सर्व 100 स्मार्ट शहरांनी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर्स (ICCC) ची स्थापना केली आहे. या शहरांमध्ये व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. नागरिकांची सुरक्षा आणि सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि आपत्ती व्यवस्थापन यासारख्या विविध क्षेत्रात शहरी सेवांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे, असे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान, आर्थिक पायाभूत सुविधांशी संबंधित 652 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. आणखी 267 प्रकल्प चालू आहेत. तर सामाजिक पायाभूत सुविधा क्षेत्रात (आरोग्य, शिक्षण, गृहनिर्माण इ.) 679 प्रकल्प पूर्ण झाले असून 153 प्रकल्पांंची कामे सुरु आहेत.


इंदूर सलग सहाव्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून निवडले गेले. 'पर्यावरण निर्मिती' श्रेणीमध्ये, कोईम्बतूरला त्याचे मॉडेल रस्ते आणि तलावांच्या जीर्णोद्धार आणि पुनरुज्जीवनासाठी सर्वोत्तम शहर म्हणून घोषित करण्यात आले. त्यापाठोपाठ इंदूरचा क्रमांक लागतो, तर न्यू टाऊन कोलकाता आणि कानपूर तिसऱ्या क्रमांकावर आहे.