नवी दिल्ली : भारत आणि रशिया या दोन देशांच्या जुन्या मैत्रीचा एक नवा अध्याय आज दिल्लीत लिहिला गेलाय. रशियाची ‘एस-400’ ही जगातली सर्वात आधुनिक मिसाईल सिस्टीम या करारानुसार आता भारत खरेदी करणार आहे. 39 हजार कोटी रुपयांत पाच मिसाईल भारताला मिळणार आहेत.

खरंतर असे द्विपक्षीय करार अनेकदा होत असतात, मात्र आजच्या कराराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की अमेरिकेच्या  धमकीला भीक न घालता भारतानं हे पाऊल उचललंय. अमेरिकेनं रशियावर निर्बंध लादलेत आणि इतर देशांनीही रशियाकडून कुठल्याही पद्धतीची शस्त्रास्त्र खरेदी करु नये यासाठी कालच अमेरिकेनं चेतावणी जाहीर केलीय. पुतीन भारतात येण्याच्या एक दिवस आधीच अमेरिकेने हा इशारा दिलेला.

संरक्षण आणि अवकाश मोहीम या दोन क्षेत्रात रशियाची मोठी मदत आजच्या करारानं होणार आहे. त्यातही ‘एस-400’ ही मिसाईल सिस्टीमची खरेदी भारताची सुरक्षा आणखी भक्कम करणार आहे.

‘एस-400’ मिसाईल ची ताकद काय आहे 

  • ‘एस-400’ हे आजच्या घडीला जगातली सर्वात आधुनिक मिसाईल सिस्टीम आहे. अमेरिकेच्या थाड मिसाईल सिस्टीमपेक्षाही त्याची मारक क्षमता अधिक आहे.

  • ‘एस-400’ हवेत 30 किलोमीटर उंच आणि जमिनीवर 400 किलोमीटर रेंजमध्ये कुठलंही लक्ष्य टिपू शकतं. भारताकडे सध्या असलेल्या मिसाईलची क्षमता 100 किलोमीटर आहे. त्या तुलनेत एस-400 मुळे ही ताकद चार पटीनं वाढणार आहे.

  • आणीबाणीच्या वेळी अगदी पाच मिनिटांत हे मिसाईल लक्ष्य टिपण्यासाठी तयार होतं. शिवाय एकावेळी जास्तीत जास्त 100 लक्ष्यांवर मारा करण्याची क्षमता त्यात आहे.

  • चीन आणि पाकिस्तानकडून मिळत असलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हे मिसाईल भारतासाठी महत्वाचं आहे.


देशात सध्या राफेल डीलवरुन राजकीय वातावरण पेटलेलं असतानाच संरक्षण क्षेत्रातली ही अजून एक महत्वाची डील पार पडतेय. 2020 पर्यंत या एस-400 मिसाईलची डिलिवरी भारताला होणार आहे. त्याआधी सप्टेंबर 2019 मध्येच राफेल विमानं भारतात दाखल होणं अपेक्षित आहे. या दोन्हीमुळे भारतीय हवाई दलाची ताकद काही पटींनी वाढणार आहे.

सुरक्षेशिवाय अवकाश मोहीमेच्या दृष्टीनंही आज महत्वाची घडामोड घडलीय. रशियातल्या नोवोसिबिर्स्क शहराजवळ एक भारतीय केंद्र बनवलं जाणार आहे. ज्या माध्यमातून भारताला हेरगिरी करणं सोपं जाणार आहे. अमेरिकेसारख्या बलाढय राष्ट्राच्या निर्बंधांना न घाबरता झालेली ही मोदी-पुतीन युती भविष्यात काय परिणाम करणार, ती देशाला कुठल्या वळणावर नेणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.